होमपेज › Konkan › ग्रीन रिफायनरीला शिवसेना, स्वाभिमानचा विरोध बेगडी!   

ग्रीन रिफायनरीला शिवसेना, स्वाभिमानचा विरोध बेगडी!   

Published On: Jan 24 2018 11:11PM | Last Updated: Jan 24 2018 11:11PMकणकवली : प्रतिनिधी

सुमारे 3 लाख कोटीचा नियोजित ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जनतेच्या हिताचाच आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून दोन्ही जिल्ह्यातील जनतेसाठी अद्ययावत हॉस्पिटल उभारले जाणार आहे. काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी, काहीजण मंत्रीपदासाठी, काहीजण आपल्या राजकीय पूनर्वसनासाठी बार्गेनिंग करत आहेत. मात्र, आपण दोन्ही जिल्ह्यातील जनतेच्या भवितव्यासाठी या प्रकल्पाकरिता आग्रही आहे. या प्रकल्पांतर्गत जनतेच्या हिताच्या मागण्या मान्य  झाल्या नाही तर भाजपचाही या प्रकल्पाला विरोध राहील. मात्र, सध्या असलेला शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाचा विरोध हा केवळ बेगडी आहे, असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. 

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केल्याने मंगळवारी गिर्येत प्रमोद जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपचे तालुकाध्यक्ष संदेश पटेल, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परूळेकर, रविंद्र शेट्ये, बबलू सावंत उपस्थित होते.  प्रमोद जठार म्हणाले,  बंदर विकासमंत्री असताना नारायण राणे यांनी विजयदुर्ग बंदर एचडीआयएल नावाच्या मुंबईतील कंपनीला खाजगी तत्वावर करार करून विकसित करण्यासाठी दिले होते. मात्र  हे बंदर एका खाजगी कंपनीच्या घशात जाऊ नये यासाठी आपण जेएनपीटीचा विश्‍वस्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना  सरकारी पोर्टमार्फत विकसित करण्याची विनंती केली.

ना. गडकरी यांनी ती मान्य केली. विजयदुर्ग बंदर विकसित होणार म्हणजे त्याला फायदेशीर  उद्योग येणे आवश्यक होते. त्यामुळेच ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प पुढे आला. विशेष म्हणजे गिर्ये, रामेश्‍वर मधील एकही घर या प्रकल्पात जात नाही. आज जे या प्रकल्पाला विरोध करत आहेत त्याच मंडळींनी मुंबई, गोव्यातील दलालांना या जमिनी विकल्या आहेत. आपण त्यांची नावे सांगत नाही परंतू सांगितली तर ती लिंक माझ्यावर आरोप करण्यापर्यंत जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही  जठार म्हणाले.

या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, खासदार उपस्थित होते. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही, परंतू जनतेला विश्‍वासात घ्या असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात दम नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना हा प्रकल्प मान्य आहे. उलट शिवसेनेने या प्रकल्पाला पाठिंबा देऊन लोकांना समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राहिला प्रश्‍न स्वाभिमानचा, आ. नितेश राणेंना आपले आपुलकीचे सांगणे आहे तुम्ही एनडीए मध्ये आला आहात, ज्यावेळी जैतापुरला तुमच्या पिताश्रींनी पाठिंबा दिला त्यावेळी पर्यावरणाचा विचार का केला नाही? तेव्हा कोकणी माणसावरील प्रेम कुठे गेले होते.

औष्णिक प्रकल्प घातक असताना त्याला पाठिंबा दिलात त्यावेळी आमच्या भाई गिरकरांना दगड झेलावे लागले. तुम्हाला वाटेल तेव्हा पाठिंबा देता, वाटेल तेव्हा विरोध करता हे सगळे तुमच्या सोयीनुसार चालले आहे. तुमच्या सोयीपेक्षा लोकांचा विचार करा असा टोलाही प्रमोद जठार यांनी आ. नितेश राणे यांना लगावला. हा प्रकल्प होत असल्याचे समजल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी त्या मान्य केल्या आहेत.  या प्रकल्पातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 1 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जनतेने आता ही संधी दवडता कामा नये, उद्या कदाचित शिवसेना आणि स्वाभिमान पक्षही या प्रकल्पासाठी राजी होईल पण जनतेच्या हाती काहीच लागणार नाही. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि प्रकल्पाला सहकार्य करा, असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले.