Mon, Jun 17, 2019 03:28होमपेज › Konkan › सेना-भाजपची चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत : ना.चव्हाण

सेना-भाजपची चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत : ना.चव्हाण

Published On: Mar 25 2018 1:49AM | Last Updated: Mar 24 2018 11:41PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची नगराध्यक्षपदासह 13 जागांवर युती झाली आहे तर 4 जागांवर दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण  लढतीने लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एकजुटीने दोन्ही पक्ष काम करणार आहेत. दोन्ही पक्षांच्या संयुक्‍त प्रचार सभा होणार असून प्रचारासाठी नेते मंडळी येतील, मात्र संदेश पारकर हेच आमचे स्टार प्रचारक आहेत, असे भाजपने नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

संदेश पारकर यांच्या निवासस्थानी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आ.शिवराम दळवी, अतुल रावराणे, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, राजन वराडकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, महेश नार्वेकर, राजन पारकर, अवधुत मालणकर आदी उपस्थित होते.

ना.चव्हाण म्हणाले, आपण आज प्रचार यंत्रणेबाबत आढावा घेतला. संदेश पारकर यांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सर्व क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. समाजातील सर्व घटकांशी त्यांचे असलेले संबंध पाहता आम्हाला यशाची खात्री आहे. या निवडणुकीत भाजपचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी एकजुटीने प्रचार करणार आहेत. 

जर भाजप आणि सेनेची युती झाली तर भाजपच्या बॅनरवर सेनेच्या नेत्यांचे फोटो का डावलण्यात आले? ही युती खरोखरच झाली की कागदावरच झाली आहे? असा प्रश्‍न विचारला असता दोन्ही पक्षाने एकमताने युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेते मंडळींचे फोटो यापुढे बॅनरवर दिसतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. येत्या काळात या शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत.

राजश्री धुमाळेंची नाराजी दूर करू

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. राजश्री धुमाळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्या नाराज आहेत, याकडे ना. चव्हाण यांचे लक्ष वेधले असता सौ. धुमाळे यांची नाराजी दूर केली जाईल. त्या पक्षाच्या ज्येष्ठ कायर्र्कर्त्या आहेत. त्या लवकरच भाजपच्या प्रचारात सक्रीय होतील असा विश्‍वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.