Sat, Dec 14, 2019 02:53होमपेज › Konkan › ‘एलईडी’ मासेमारीविरोधात शिवसेना आमदार आक्रमक

‘एलईडी’ मासेमारीविरोधात शिवसेना आमदार आक्रमक

Published On: Jun 19 2019 1:35AM | Last Updated: Jun 18 2019 11:21PM
मालवण : वार्ताहर
कोकण किनारपट्टीवर एल.ई.डी. लाईटद्वारे केल्या जाणार्‍या मच्छीमारीमुळे  पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणार्‍या मच्छीमारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे एल.ई.डी. मच्छीमारी बंद झालीच पाहिजे, पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत शिवसेना आमदारांनी मुंबई विधान भवनाच्या पायर्‍यांवर  आंदोलन छेडले. 

सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य विभागाला शासनाची गस्ती नौका मिळावी.  एल.ई.डी. मासेमारीवर कारवाईसाठी शासनाने कडक कायदा अंमलात आणावा आदी मागण्या यावेळी आमदारांनी केल्या. 

कोकण किनारपट्टीवर एल.ई.डी. मच्छीमारीचे प्रमाण वाढत असून मोठमोठ्या बोटीमधून 25 ते 30 बोटी एल.ई.डी. लाईटच्या प्रखर प्रकाशझोताच्या साहाय्याने मासेमारी करून मत्स्य बीजाची लयलूट करत आहेत. कर्नाटक, गोवा, केरळ, गुजरात या ठिकाणच्या मोठमोठ्या कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. अशा प्रकारच्या मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात समुद्रातील मासळीची लूट होत आहे.       
या अवैध मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. ही मच्छीमारी अशीच सुरु राहिल्यास भविष्यात समुद्रातील मत्स्य बीज नष्ट होणार असून पारंपारिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. परिणामी पारंपारिक मच्छीमार उध्वस्त होणार आहे. यामुळे हि एल.ई.डी. मच्छीमारी पूर्णतः बंद होऊन पारंपारिक  मच्छीमारांना न्याय मिळवा अशी भूमिका असल्याचे आ. वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. आ. वैभव नाईक, आ. अशोक पाटील, आ. रमेश लटके , आ. सुजित मिणचेकर, आ. सुभाष भोईर आदी उपस्थित होते.