Wed, Aug 21, 2019 15:37होमपेज › Konkan › चिपळुणातील शिवसेनेत ‘संशयकल्लोळ’

चिपळुणातील शिवसेनेत ‘संशयकल्लोळ’

Published On: Feb 12 2018 1:54AM | Last Updated: Feb 11 2018 7:56PMचिपळूण : शहर वार्ताहर

भाजी मंडईतील व्यापारी गाळे लोकार्पण सोहळ्याला सेनेचे माजी आमदार बापू खेडेकर यांच्या उपस्थितीने शिवसेनेत ‘संशयकल्लोळ’ नाट्य सुरू झाल्याची  चर्चा सेना  वर्तुळात आहे. एकीकडे या कार्यक्रमावर सेनेने बहिष्कार टाकला होता. मात्र, बापू खेडेकर यांनी लोकार्पण सोहळा केला. यावरून बापूंच्या शिवबंधनाची गाठ सैल झाली की काय? अशी चर्चा शिवसैनिकात सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी चिपळूण न.प. ने भाजी व्यावसायिक, व्यापार्‍यांचा विरोध बाजूला ठेवून मंडईतील व्यापारी गाळ्यांचा लोकार्पण सोहळा केला. यावेळी रत्नागिरी व रायगडच्या पालकमंत्र्यांसह आजी-माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष यांना बोलावण्यात आले. मात्र, यापैकी कुणीही हजेरी न लावल्याने सेनेचे माजी आमदार बापू खेडेकर यांना गाळ्यांचे लोकार्पण करण्याचा मान मिळाला. बापूंनी देखील संधीचे सोने केले. परंतु बापू खेडेकर यांच्या या कृतीमुळे शिवसेनेत मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याच कार्यक्रमावर शिवसेना नगरसेवक व त्यांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यानुसार, नेते  व नगरसेवक कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. परंतु माजी आमदार खेडेकर यांनी लोकार्पण सोहळा केला. यावरून चिपळूण शिवसेनेत खेडेकर यांच्या या कृतीने नाराजीचे पडसाद उमटत आहेत.

उद्घाटन सोहळ्यापूर्वी न.प. प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम अंतर्गत पानगल्लीत कारवाई केली. यावेळी पानगल्लीतील काही व्यापार्‍यांचे नुकसानही झाले. त्याचे पडसाद रात्री उशिरापर्यंत पानगल्लीत उमटले. ही माहिती बापूंना समजली. त्यांनी तातडीने पानगल्लीत धाव घेतली. त्यानंतर सुमारे तासभर न. प. प्रशासन, व्यापारी यांच्यात खडाजंगी झाली. खेडेकर यांनी प्रशासनाला शिवसेना स्टाईलने खडसावले. न. प. सत्ताधार्‍यांवर आगपाखड केली. चुकीच्या मोहिमेचे समर्थन झाल्यास व प्रशासनाला पाठीशी घातल्यास व्यापारी व शिवसैनिक आक्रमक होतील, अशा भावना खेडेकर यांनी चर्चेमध्ये व्यक्‍त केल्या. माजी आमदार खेडेकर यांचा पवित्रा पाहून न. प. प्रशासनाने माघार घेतली, तर दोन्ही बाजूकडून वाद मिटविण्यासाठी खेडेकर यांनी शिवसेना स्टाईल मध्यस्थी केली. या घडामोडीनंतर दुसर्‍या दिवशी (शुक्रवारी) मंडईतील व्यापारी गाळ्यांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. सेनेच्या बहिष्काराच्या पार्श्‍वभूमीवर बापू खेडेकर यांची या कार्यक्रमातील उपस्थिती शिवसेनेला खटकल्याने संशयकल्लोळ वाढला आहे.

दुटप्पी भूमिकेने संभ्रम

एकीकडे शिवसेनेच्या भूमिकेला साथ देताना खेडेकर यांनी पानगल्लीतील व्यापार्‍यांच्या बाजूने खिंड लढवली, तर दुसरीकडे दुसर्‍याच दिवशी लोकार्पण सोहळ्याच्या रिबिनची गाठ सोडली. यातून बापूंच्या शिवबंधनाची गाठ सैल झाली की काय? अशा चर्चेची स्वगते आता संशयकल्लोळ नाट्यातून ऐकायला मिळत आहेत.