Fri, Sep 21, 2018 14:15



होमपेज › Konkan › ‘नाणार’ विरोधात शिवसेनेची रविवारी ‘चले जाव’ संघर्ष यात्रा

‘नाणार’ विरोधात शिवसेनेची रविवारी ‘चले जाव’ संघर्ष यात्रा

Published On: Jul 05 2018 8:55PM | Last Updated: Jul 05 2018 8:55PM



राजापूर : प्रतिनिधी

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात  शिवसेना ‘चले जाव संघर्ष यात्रा’ काढणार आहे.  पहिल्या टप्प्यात  दि. 8 जुलैला सकाळी 11 वाजता डोंगर तिठा ते चौके अशी ही यात्रा असेल, असे शिवसेना खा. विनायक राऊत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.  

राजापूर नगर परिषद निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ते राजापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यमान केंद्र व राज्य शासनांनी निसर्गरम्य कोकणभूमीला अरबांच्या घशात घालण्याचा डाव रचला असून हे प्रयत्न शिवसेना कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असा त्यांनी इशारा दिला. स्थानिकांचा प्रखर विरोध असतानादेखील केंद्र सरकारने सौदीची ‘अराम्को’ कंपनी व अबुधाबीची सनॉक या परदेशी कंपन्यांशी करार केले आहेत. शिवसेना त्याविरोधात असून कोणत्याही परिस्थितीत या परदेशी कंपन्यांना कोकणच्या भूमीत थारा दिला जाणार नाही. त्यासाठी शिवसेना आक्रमकपणे विरोध करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर प्रकल्प लादणार नाही  तर त्यांच्याशी चर्चा करु असे म्हणतात,  मग ते नाणारवासीयांना भेटण्यासाठी का येत नाहीत? अशी विचारणा केली.

प्रकल्पाविरोधात ‘चले जाव’ संघर्ष यात्रा आता आम्ही काढणार असून पहिल्या टप्प्यात  दि. 8 जुलैला सकाळी 11 वाजता डोंगर तिठा ते चौके अशी 2 कि.मी.ची ती यात्रा असेल. यात शिवसेनेचे आमदार, खासदार सहभागी होणार आहेत, अशी त्यांनी माहिती दिली.