Tue, Apr 23, 2019 10:18होमपेज › Konkan › दोडामार्ग नगराध्यक्षपदी सेनेच्या कुबल 

दोडामार्ग नगराध्यक्षपदी सेनेच्या कुबल 

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 10:18PMदोडामार्ग  ः प्रतिनिधी

कसई-दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या पाच पैकी चार नगरसेवकांनी व्हीप डावलत शिवसेनेला मतदान केले. यामुळे शिवसेनेच्या  लीना कुबल यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या सौ. उपमा गावडे यांचा 9 विरुद्ध 5 मतांनी पराभव केला. भाजपच्या रेश्मा कोरगावकर यांना फक्‍त आपलेच मत मिळाले. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत भाजपचे गटनेते चेतन चव्हाण यांनी स्वाभिमानच्या हर्षदा खरवत यांचा 9 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला. निवडीदरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जाधव, साक्षी कोरगावकर अनुपस्थित राहिल्या होत्या.मनसेचे निर्णायक मतही सौ.कुबल व चव्हाण यांना मिळाले. 

दोडामार्ग नगरपंचायतीची नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत  खांडेकर यांच्या उपस्थितीत झाली. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून रेश्मा कोरगावकर, स्वाभिमानकडून उपमा गावडे, तर शिवसेनेकडून लीना कुबल यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपकडून रेश्मा कोरगावकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केल्याने भाजपच्या इतर चार नगरसेवकांनी बंड करून शिवसेनेशी हात मिळवणी केली. चारही नगरसेवकांनी पक्षीय व्हीप डावलून शिवसेनेच्या लीना कुबल यांना मतदान केले. तसेच मनसेच्या एका नगरसेवकाने आपले निर्णायक मत शिवसेनेच्या पारड्यात टाकल्याने अखेर नगरपंचायतीवर सेनेने भगवा फडकविला. 

शनिवारी सकाळी 10 वा. भाजपचे चार तसेच मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर, सेनेच्या लीना कुबल, सुष्मा गिरकर, दिवाकर गवस, संतोष म्हावळकर आदी  नऊ नगरसेवक नगरपंचायतीमध्ये दाखल झाले. त्यानंतर  भाजपच्या रेश्मा कोरगावकर व स्वाभिमानचे संतोष नानचे, हर्षदा खरवत, विनया म्हावळणकर, उपमा गावडे आदिती मणेरीकर सभागृहात दाखल झाले. मात्र, राष्ट्रीय   नगरसेवक मतदान प्रक्रिया सुरू झाली तरी सभागृहात पोहचले नाही. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. सेनेच्या सौ.लीना कुबल यांना मनसे व भाजपच्या इतर चार नगरसेवकांनी मतदान केल्याने त्या 9 मते घेवून विजयी झाल्या. तर स्वाभिमानच्या सौ.उपमा गावडे यांना पाच मते मिळाली. तर सौ.कोरगावकर यांना केवळ त्यांचे स्वतःच्या एका मतावर समाधान मानावे लागले. 

उपनगराध्यक्षपदासाठी भाजपचे गटनेते चेतन चव्हाण व स्वाभिमानच्या सौ. हर्षदा खरवत यांच्यात निवडणूक झाली. यावेळी नगराध्यक्ष निवडीला अनुपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक अरूण जाधव व सौ.साक्षी कोरगांवकर सभागृहात उपस्थित झाल्या. सौ.खरवत यांना सात मते मिळाली तर श्री.चव्हाण यांना नऊ मते मिळाल्याने ते दोन मतांनी विजयी झाले. भाजपाच्या सौ.रेश्मा कोरगावकर यांनी  उपनगराध्यक्ष निवडीवेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. भाजपकडून बजावण्यात आलेला व्हीप डावलून चार नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर कोणती कारवाई होते याकडे लक्ष आहे. सर्वांना विश्‍वासात घेवून शहराच्या विकास करणार, असे नूतन नगराध्यक्ष सौ.लीना कुबल यांनी सांगितले. आम्ही पुढील अडीच वर्षात शहरातील समस्या एकत्रित राहून सोडविणार असल्याची प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली. तसेच पक्षाने बजावलेल्या व्हीपविषयी त्यांनी बोलणे टाळले. यावेळी शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी, प्रकाश परब, शब्बीर मणीयार, उपजिल्हाप्रमुख गणेश प्रसाद गवस, पं.स.सदस्या धनश्री गवस उपस्थित होत्या.