Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Konkan › शिवसेना-भाजपची कणकवलीत युती

शिवसेना-भाजपची कणकवलीत युती

Published On: Mar 19 2018 10:37PM | Last Updated: Mar 19 2018 10:12PMकणकवली : प्रतिनिधी

राज्यात सत्तेत असलेले भाजप आणि शिवसेना हे पक्ष आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याच्या पवित्र्यात असताना सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतीची निवडणूक मात्र युती करून लढविण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे युवा नेते संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू होती. चार जागांवर तोडगा होत नसल्याने युती होणार की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, सोमवारी दुपारी पुन्हा एकदा या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर शिक्‍कामोर्तब केले. 

या तिन्ही नेत्यांनी दुपारी पत्रकारांशी बोलताना सेना-भाजपची युती झाल्याचे सांगून नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर हे युतीचे उमेदवार असल्याचे सांगितले. तर नगरसेवकपदाच्या 13 जागांवर तडजोड झाली आहे. उर्वरित 4 जागांवर चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत म्हणजे 26 मार्चपर्यंत याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा व्यक्‍त केली. यावेळी भाजपचे अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संदेश पटेल, सौ. राजश्री धुमाळे, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शिवसेनेचे कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, शहरप्रमुख शेखर राणे, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

गेल्या महिनाभराचे चित्र पाहता शिवसेनेने ही निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्थानिक पातळीवर युवा नेते संदेश पारकर आणि आ. वैभव नाईक यांच्यात असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांमुळे या निवडणुकीत युती करावी याद‍ृष्टीने प्रयत्न सुरू झाले. शिवसेनेने जर संदेश पारकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील तरच युतीबाबत विचार केला जाईल, अशी भूमिका घेतली होती. तसेच भाजपच्या पक्षश्रेष्ठींनीही संदेश पारकर यांनाच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला होता. 
 

Tags : Shivsena, BJP, alliance, kankavali