Thu, Apr 25, 2019 11:26होमपेज › Konkan › शिवरायांच्या जयघोषात राज्याभिषेक सोहळा

शिवरायांच्या जयघोषात राज्याभिषेक सोहळा

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 10:32PMकिल्ले रायगड : वार्ताहर

रिमझिम पाऊस, मधूनच उठणारे धुके, अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर बुधवारी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी हजारो शिवभक्‍तांनी गर्दी केली होती.  शिवभक्‍तांच्या शिवगर्जनांनी रायगड दुमदुमून गेला. यावेळी खा. संभाजीराजे यांनी सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे आपली जबाबदारी असून, गड-किल्ले प्लास्टिकमुक्‍त कसे राहतील, याची खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन केले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत गेली अनेक वर्षे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. दरवर्षीपेक्षा यावर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रायगड रोप वे यामुळे शिवभक्‍तांच्या गर्दीने फुलून गेले होते.शिवभक्‍तांच्या तोंडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हा एकच नारा दिला जात असल्याने संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोप वे परिसर दुमदुमून गेला. जिकडे-तिकडे हातात घेतलेल्या भगव्या पताका, फेटे बांधलेले शिवभक्‍त दिसून येत होते.

पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. गडावर वाजणारे ढोल-ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. शाहिरांच्या या पोवाड्यांना शिवभक्‍तांनी उठून दाद दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी वाजतगाजत राजसदर येथे आणण्यात आली. राजसदरेवर खा. संभाजीराजे, शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. सह्याद्री ट्रेकर्स यांच्या वतीने आणण्यात आलेल्या पंच जलकुंभातील पाणी आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. खा. संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला आणि समोरील शिवभक्‍तांनी छत्रपती शिवरायांचा एकच जयघोष केला.

रायगड संवर्धन काळाची गरज : संभाजीराजे

रायगड संवर्धन ही काळाची गरज आहे. शासनाने गेली अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष केले होते; पण आता पुढील वर्षी शिवभक्‍तांची गैरसोय होणार नाही, असे अभिवचन खा. संभाजीराजे यांनी दिले. गैरसोय होत असली तरी किल्ले रायगडावर गर्दी आहे. मात्र, गड-किल्ले अबाधित राहिले पाहिजेत, याकरिता सध्याचा शत्रू असलेल्या प्लास्टिकला हद्दपार करा आणि प्रत्येक शिवभक्‍ताने आपला रायगड स्वच्छ ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवराज्याभिषेकासाठी डच, इंग्रज व फ्रेंचच्या भारतीय राजदूतांना रायगडावर आमंत्रित करून शिवछत्रपतींच्या शौर्यशाली इतिहास दाखवणार असल्याचे  त्यांनी सांगितले.शिक्षण सम्राट, उद्योग सम्राट व सहकार सम्राट यांनी दिल्लीत शिवजयंती साजरी का केली नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत संभाजीराजे म्हणाले, कोरेगाव भीमा घटना मला आवडली नाही. छत्रपती शिवराय,  राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत अशा घटना घडणे योग्य नाही. अशा घटना रोखण्यासाठी मी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. शेतकर्‍यांबद्दल सहानुभूती दाखवणार्‍या नेत्यांना शेतकर्‍यांविषयी किती कळवळा आहे, याचा अभ्यास मी करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी माझा लढा सुरू राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, गडावरील 84 टाक्यांमधील पाणी शिवभक्‍तांना उपलब्ध करून देणार आहे. तसेच रायगड विकास प्राधिकरणातर्फे गडपायथ्यापासून माथ्यापर्यंत फरसबंद करणार आहे. औरंगाबादमधील रायगडचे अवशेष गडावर परत आणणार. गडाच्या कामात हेळसांड केल्यास त्याला क्षमा नाही.यावेळी दुग्ध आणि पशुपालन राज्यमंत्री महादेव जानकर, फिजी देशाचे राजदूत धुनील कुमार, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, राष्ट्रसेवा समूह या संस्थेचे अध्यक्ष राहुल पोकळे, निवृत्त कोकण आयुक्‍त प्रभाकर देशमुख, आदी उपस्थित होते.