Wed, Jun 26, 2019 18:00होमपेज › Konkan › २० सांसद गावात शिवापूरचा समावेश व्हावा 

२० सांसद गावात शिवापूरचा समावेश व्हावा 

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 8:07PMकुडाळ ः प्रतिनिधी 

भारतातील 543 गावे सांसद आदर्श योजनेत समाविष्ट  आहेत, त्या गावातून 20 गावे निश्‍चित करावयाची आहेत. त्या 20 गावात शिवापूर गावाचे नाव येण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अधिकार्‍यांनीही प्रामाणिक काम करावे, चालढकल करण्यार्‍या अधिकार्‍यांची यापुढे गय केली जाणार नसल्याचे खा. विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले. शिवापूर गावाचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करावयाचा आपला मानस असल्याचे सांगत ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

शिवापूर येथील ग्रा.पं.मध्ये सांसद आदर्श दत्तक गाव योजनेची आढावा बैठक बुधवारी खा.विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, सरपंच यशवंत कदम, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, गटनेते  नागेंद्र परब, जि.प.सदस्य  संजय पडते, अनुप्रीती खोचरे, राजू कविटकर, महिला संघटक जान्हवी सावंत, बांधकाम उपअभियंता जे.डी.कांबळे,  ग्रामपंचायत पाणीपुरवठा अभियंता पाताडे, सा.बां.उपअभियंता अनामिका जाधव, गटशिक्षणाधिकारी गोडे, ल.पा.चे उपअभियंता नानल, पशुविभागाचे डॉ.मुळीक आदी उपस्थित होते. 

खा. राऊत म्हणाले,  सलग आचारसंहिता आल्यामुळे 6 महिने दत्तक शिवापूर गावाच्या विकासकामाबाबत आढावा बैठक घेणे शक्य झाले नाही. शिवापूर गावात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना येण्यासाठी ग्रा.पं.पातळीवर सरपंच व ग्रामसेवकांनी प्रयत्न करावेत. तालुका व जिल्हा पातळीवरील अधिकारी तुम्हाला सहकार्य करतील. या गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण पर्यटनात मनोसंतोष गड, कातळ शिल्प व कर्ली नदीचा उगम या ठिकाणांचा विकास करण्याचे आमचे नियोजन आहे. लवकरच अधिकार्‍यांची टीम याठिकाणी येऊन पाहणी करून प्रस्ताव करतील. यासाठी ग्रामस्थांना सहकार्य करावे असे सांगितले.शिवापूर येथील बचतगट दिल्लीतील राष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी व्हावा यासाठी अधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन त्यांना चांगले प्रशिक्षण द्यावे अशा सक्‍त सूचना केल्या.

आढावा दरम्यान गावात वायरमन नसल्याचे खा. राऊत यांच्या लक्षात येताच उपस्थित महावितरणच्या अधिकारी श्रीमती पाटील यांना दोन दिवसात वायरमन  देण्याची सूचना केली. बैठकीदरम्यान वारंवार लाईट जात असल्यामुळे उपस्थित महावितरण अधिकार्‍यांना त्यांनी खडेबोल सुनावले. दुग्ध व्यवसायाची तालुक्यात 28 प्रकरणे होती. मात्र, शिवापूर गावातील एकही प्रकरण मंजूर झाले नाही, याबाबत डॉ. भिसे व डॉ. मळीक यांना त्यांनी चांगलेच फटकारले. डॉ. भिसे यांनी आठवड्यातून दोन दिवस शिवापूर गावात भेट द्यावी अन्यथा निलंबित केले जाईल, असा इशारा दिला. शिवापूर प्राथमिक उपकेंद्रात डॉ.लवटे यांनी याठिकाणी हजर राहावे. या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आमच्या कानावर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले.  ग्रामस्थांनी येथील समस्या खा. राऊत यांच्यासमोर कथन केल्या.