Tue, Jun 18, 2019 22:17होमपेज › Konkan › शिवजयंती सण, उत्सव म्हणून साजरी करणार

शिवजयंती सण, उत्सव म्हणून साजरी करणार

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 9:27PMकणकवली : वार्ताहर

लोककल्याणकारी राजा, रयतेचा राजा अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यावर्षी सण उत्सव स्वरूपात साजरी केली जाणार आहे. सकल मराठा समाजाच्या पुढाकारातून आणि सर्व धर्मियांच्या सहभागातून कणकवली येथे 18 व 19 फेब्रुवारी रोजी भरगच्च असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील घराघरामध्ये शिवजयंती सण उत्सव म्हणून साजरी व्हावी यासाठीचे नियोजन केले जात आहे. 

सकल मराठा समाजाच्यावतीने कणकवली येथे सुरू करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमांच्या आयोजनाविषयी माहिती देण्यात आली. सुशील सावंत, भाई परब, सुशांत नाईक,  बच्च प्रभूगावकर, बाबू सावंत, शेखर राणे, सोनू सावंत, अनुप वारंग, परेश बागवे, महेंद्र सांब्रेकर, महेश सावंत, तेजस राणे आदी उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त 18 फेब्रुवारी दुपारी 3.30 वा. येथील स्वामी विवेकानंद हॉल येथे साहित्यिक व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान होणार ओह. सायं. 5 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची नरडवे तिठा, महामार्ग बाजारपेठ ढालकाठी मार्गे विद्यामंदिर पटांगण अशी भव्य मिरवणूक होणार आहे. 

शिवजयंती दिनी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी विद्यामंदिर पटांगण येथे शिवरायांच्या मूर्तीची स्थापना होणार असून मान्यवरांची उपस्थिती व सन्मान सोहळा होणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गात प्रथमच किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धा होणार आहे. सायं. 7 वा. शिवचरित्रावर आधारित लेझर शो होणार आहे. तर रात्री 9 वा. सर्व धर्मियांसाठी मार्गदर्शक असे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे नाटक गाजले असून अनेक गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत.  अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात 58 क्रांतीमोर्चा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जागृती व संघटन निर्माण झाले आहे. हे क्रांती मोर्चा कोणत्याही समाजाविरोधात नव्हते. तर ते एका भगिनीच्या बलिदानातून सर्व समाज एकत्र आला होता. त्यातूनच शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिवरायांनी सर्व धर्मियांना एकत्र घेत स्वराज्याची निर्मिती केली. या स्वराज्य निर्मितीमध्ये शिवरायांच्या एका शब्दासाठी प्राणाची बाजी लावण्यासाठी अनेकजण पुढे आले, हे कोणत्याही एका धर्माचे नव्हते. त्यामुळे सर्वांच्या सहभागातून शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव म्हणून साजरी केली जाणार आहे, असे सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर करण्यात आले.