Fri, Apr 26, 2019 17:48होमपेज › Konkan › श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्‍वरमध्ये शिवभक्‍तांचा महासागर

श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्‍वरमध्ये शिवभक्‍तांचा महासागर

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 10:18PMदेवगड ः प्रतिनिधी

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या कुणकेश्‍वरमध्ये श्रावणी सोमवार निमित्त श्री.कुणकेश्‍वर दर्शनासाठी शिवभक्‍तांची गर्दी झाली होती. भाविकाच्या अलोट गर्दीमुळे मंदिर परिसरात जणू शिवभक्‍तांचा महासागर उसळल्याचे भासत होते. दुसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे श्रावणी सोमवार निमित्त कुणकेश्‍वर दर्शनासाठी  जिल्हयातील भाविकांबरोबरच परजिल्ह्यातील शिवभक्‍त मोठ्या संख्येने   दाखल झाले होते. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्टने नेटके नियोजन केले होते.दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. जि.प.अध्यक्ष सौ.रेश्मा सावंत यांनी श्रीकुणकेश्‍वराचे दर्शन घेतले.त्यांचा कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. जि.प.सदस्या सौ.सावी लोके, सरपंच सौ.नयना आचरेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते.

असंख्य भाविकांबरोबरच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही कुणकेश्‍वराचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात येणार्‍या चार श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध उपक्रम देवस्थान ट्रस्टच्यावतीने आयोजित करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून या श्रावण सोमवारी कुणकेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्ट व आरोग्य विभाग देवगड तालुका आणि वसंत सुधा चॅरिटेबल ट्रस्ट (संजीवनी हॉस्पिटल कणकवली) यांच्या विद्यमाने  मोफत आरोग्य शिबिर व औषध वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.या शिबिराचा लाभ 670 रुग्णांनी लाभ घेतला.जिल्हयातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरामध्ये रुग्ण तपासणी केली.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष कोंडके, सरपंच सौ.नयना आचरेकर, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य,डॉ.रामदास बोरकर,  डॉ. सुनील आठवले व कुणकेश्‍वर ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरामध्ये रक्‍तदाब तपासणी, मधुमेह, हिमोग्लोबीन, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, इ.जी.सी, कान, नाक, घसा, डोळे तपासणी, महिला व मुलांच्या आजाराची तपासणी,ह्दयविकार व दमा तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले.