Tue, Apr 23, 2019 14:20होमपेज › Konkan › शिवसेनेची भूमिका दुटप्पी : काळसेकरांचे टीकास्त्र

शिवसेनेची भूमिका दुटप्पी : काळसेकरांचे टीकास्त्र

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 11:33PMमालवण : प्रतिनिधी

मच्छीमारांच्या प्रश्‍नांबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. एलईडी लाईट मासेमारीवर बंदी यावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करतात. तर रत्नागिरीत एलईडी बोटी पकडल्यावर त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आ. उदय सामंत मत्स्यव्यवसाय खात्याच्या अधिकार्‍यांवर दबाव आणतात. तर खा. विनायक राऊत रत्नागिरीत आधुनिक मच्छीमारीच्या बाजूने तर सिंधुदुर्गात पारंपारिक मच्छीमारांच्या बाजूने असल्याचे दाखवत आहेत. अनधिकृत मासेमारी विरोधात सुरू असलेल्या मच्छीमारांच्या लढ्याला शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची दुटप्पी भूमिका विनाशक ठरणारी आहे, अशी टीका करतानाच शिवसेनेने एलईडी व पर्ससीन मच्छीमारीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत केलेेे.

मालवण येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अतुल काळसेकर बोलत होते. तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, आरोग्य सभापती आपा लुडबे, नगरसेवक गणेश कुशे, मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर, बंड्या सावंत, अभिषेक चव्हाण आदी उपस्थित होते.

अतिरेकी व विनाशकारी अशा एलईडी लाईट मासेमारीने जिल्ह्याच्या समुद्रात धुमाकूळ घातला असताना एलईडी व  पर्ससीन मासेमारी विरोधात जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. शिवसेनेची सिंधुदुर्गात एलईडी विरोधात भूमिका असली तरी रत्नागिरीत मात्र एलईडी मासेमारीच्या बाजूने भूमिका आहे. एकाच पक्षाचे आमदार, खासदार हे वेगवेगळी भूमिका घेत असल्याने शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर येत आहे. त्यामुळे खा. विनायक राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करावी, असे अतुल काळसेकर म्हणाले.

एलईडी मच्छीमारी विरोधात मालवणमध्ये स्थानिक मच्छीमारांनी संघर्ष पुकारल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नातून केंद्रीय स्तरावर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मुख्य उपस्थितीत दिल्ली येथे कृषी- मत्स्यचे सचिव, कोस्ट गार्ड कमांडर, गोव्याचे आमदार श्री. सावळेकर यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनधिकृत मच्छीमारी रोखण्यासाठी अंमलबाजावंणी कक्ष स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. या बैठीकीचा दबाव प्रशासनावर असल्यामुळे रत्नागिरीत पर्ससीन ट्रॉलर्स पकडण्याची कारवाई करण्यात आले असून पुढेही कारवाई होत राहील. एलईडी लाईटद्वारे होणार्‍या मच्छीमारीबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात आली. या भेटीत एलईडी मच्छीमारी करणार्‍या बोटी अवरुद्ध करण्याची कायद्यात तरतूद नसल्याने अडचण येत असल्याचे भाजप पदाधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिले. त्यासाठी मासेमारी कायद्यात सुधारणा व्हावी यासाठी भाजप पदाधिकारी अभ्यासगटामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे काळसेकर यांनी सांगितले.
संयुक्त गस्तीसाठी मच्छीमार तरुणांची मदत

ग्लोबल क्लायंट फंडच्या कम्युनिस्ट केडरमधून एलईडी  व पर्ससीन बोटींवर संयुक्त गस्त घालण्यासाठी मच्छीमार समाजातील तरुणांना समाविष्ट करून घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. यासाठी मच्छीमार समाजातील तरुणांना मानधनही देण्यात येणार आहे. पाच वर्षांसाठी अशा प्रकारचा करार करून एलईडी पर्ससीन मासेमारीवर गस्त ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे काळसेकर म्हणाले.