Wed, Jan 23, 2019 17:52होमपेज › Konkan › नाणार विरोधात सेनेचा एल्गार

नाणार विरोधात सेनेचा एल्गार

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 10:11PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून शुक्रवारी  विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. विरोध झुगारून प्रकल्प लादण्याचे काम शासनाकडून सुरू असल्याने हे प्रयत्न कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सेनेच्या आमदारांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव हेदेखील या आंदोलनात  सहभागी झाले होते.राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला सुरू झाले. त्यामध्ये रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार रणकंदन माजणार, हे निश्‍चित होते. त्याची झलक शुक्रवारी पाहायला मिळाली. शिवसेनेच्या महाराष्ट्रातील आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या मारून केंद्र व राज्य शासनांनी लादलेल्या विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात निषेधाच्या बुलंद घोषणा दिल्या. शिवसेनेचे विधीमंडळातील प्रतोद आ. सुनील प्रभू, आ. राजन साळवी यांसह राज्यातील सेना आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव 
हेदेखील या आंदोलनात दिसून आले.

यानंतर सेना प्रतोद आ. सुनील प्रभू व आ. राजन साळवी  यांनी कोकणच्या माथी प्रकल्प लादणार्‍या शासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. शिवसेना सदैव जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी ठाकली असून नाणार प्रकल्प जोवर रद्द होत नाही, तोवर आम्ही गप्प बसणार नाही. शासनाची दडपशाही चालू देणार नाही. रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, त्यासाठी सभागृहातदेखील शासनाला प्रखर विरोध करुन हा प्रकल्प रद्द करायला भाग पाडल्याशिवाय रहाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शासनाला ठणकावले.नागपूर अधिवेशनाच्या सुरवातीलाच शिवसेनेने नाणारवरुन विरोधाचे रणशिंग फुंकले असून प्रकरण अधिक तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.