Tue, May 21, 2019 22:56होमपेज › Konkan › शिवसेना जनतेसोबतच

शिवसेना जनतेसोबतच

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 10:32PMकणकवली : प्रतिनिधी

राजापूर-नाणार येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा ठाम विरोध असल्याने शिवसेना जनतेसोबत आहे. जनतेला हा प्रकल्प नको असेल, तर तो आम्ही लादणार नाही. मॅग्‍नेटिक महाराष्ट्र परिषदेत या प्रकल्पाचा करार झालेला नाही. जमिनीची मोजणी न करण्याचे आदेशही आपण दिले आहेत. या प्रश्‍नावर शिवसेनेने कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. उलट आमच्यावर दुटप्पीपणाचा आरोप करणारे नारायण राणे हेच दुटप्पी आहेत, अशी टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत आणि शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सिंधुदुर्ग दौर्‍यावर आले होते. सकाळी कणकवलीत नगरपंचायत निवडणूक पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, आ. रवींद्र फाटक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश भोगले, युवासेना तालुकाप्रमुख राजू राठोड, शहरप्रमुख शेखर राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

सुभाष देसाई म्हणाले, ज्या दहा गावांमध्ये हा प्रकल्प साकारणार आहे त्या सर्व दहाही गावांच्या ग्रामसभेत या प्रकल्पाला विरोध असल्याचे ठराव घेण्यात आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या गावच्या सरपंचांसहीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जनतेच्या भावना कळविल्या आहेत. मॅग्‍नेटिक महाराष्ट्र परिषदेत जवळपास साडेतीन हजार करार झाले. परंतु, नाणार प्रकल्पाबाबत कोणताही करार झालेला नाही. ज्यावेळी त्या भागातील लोकांनी जमीन मोजणीला विरोध केला त्यावेळी आपण जनतेचा विरोध असताना जमिनीची मोजणी करू नका, असे स्पष्ट आदेश एमआयडीसी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिले. 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार जमीनमालकांच्या संमतीशिवाय जमीन संपादन करता येत नाही. त्यामुळे लोकांच्या मर्जीविरुद्ध प्रकल्प करणे अशक्य आहे. आता निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावयाचा आहे.

जर केंद्र सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला, तर आपण  मंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि जनतेसोबत रस्त्यावर उतरेन हे विधिमंडळात स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकल्पात कोणताही संभ्रम नाही, अशी भूमिका ना. देसाई यांनी स्पष्ट केली. 

ते म्हणाले, कोकणातील प्रलंबित प्रश्‍न आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणावर आणि ना. एकनाथ शिंदे यांच्यावर कोकणची जबाबदारी दिली आहे. आज आम्ही कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले. कोकणातील सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. यासाठी लवकरच मंत्री डॉ. दीपक सावंत आणि विजय शिवतारे यांना घेऊन सिंधुदुर्गात पुन्हा एकदा आम्ही दोन्ही मंत्री येणार आहोत. कोकणातील प्रलंबित प्रश्‍नांचा पाठपुरावा करून ते सोडविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. या निवडणुकीत निश्‍चितपणे सिंधुदुर्गातील कणकवली विधानसभा मतदारसंघावरही भगवा फडकेल, असा विश्‍वास ना. देसाई यांनी व्यक्‍त केला.