Sat, Jul 20, 2019 02:10होमपेज › Konkan › राजापुरात खरा सामना आघाडी विरुद्ध शिवसेना

राजापुरात खरा सामना आघाडी विरुद्ध शिवसेना

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:37PMराजापूर : प्रतिनिधी

येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत एकत्र लढणारी काँगेस आघाडी विरुद्ध स्वतंत्रपणे लढणारे शिवसेना, भाजप यामुळे मागील प्रमाणेच याहीवेळी तिरंगी लढत होणार असून यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणार्‍या निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दि. 15 जुलै रोजी  ही निवडणूक  होत आहे. त्यामध्ये काँग्रेस आघाडीकडून प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर व भाजपकडून त्यांचे  पालिकेतील एकमेव नगरसेवक गोविंद चव्हाण रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरु आहे. त्यांचे पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या प्रभागात प्रचारकार्यात सहभागी झाले आहेत. शिवसेनेकडून आ. राजन साळवींसह त्यांचे पदाधिकारी प्रचारात उतरले असतानाच काँग्रेस आघाडीकडून विधान परिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे माजी युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव व दोन्ही पक्षांचे पदाधिकारी किल्ला लढवत आहेत. भाजपमधून बंडखोरी केलेल्या शीतल पटेल यांच्या माघारीनंतर भाजपच्या तंबुतून सुटकेचा निश्‍वास सोडण्यात आला असून आता भाजपचे कार्यकर्तेही प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र, उमेदवारी देण्यावरुन भाजपमध्ये जे नाट्य घडले होते ते पाहता दुभंगलेली मने पुन्हा सांधली जाऊन या पक्षाकडून एकसंध प्रचार होईल का, हाही तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

या निवडणुकीत शहरातील विकासाच्या मुद्यावर उमेदवारांकडून भर देण्यात आला आहे. शहराला भेडसावणारा पाणी प्रश्‍न, रस्ते, वीज, घनकचरा व्यवस्थापन यांसह अनेक समस्या गेली अनेक वर्षे भेडसावत असून त्या सोडविण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार असल्याचे उमेदवारांकडून सांगितले जात आहे. यामध्ये नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे गेले एक दशक नगरसेवक म्हणून कार्यरत असून, त्यांनी पालिकेत सभापतीपदही  भूषविले आहे. यावेळी ते उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच नगराध्यक्ष पदाचा अतिरिक्‍त कार्यभार त्यांच्याकडे आला. आपल्या गत कार्यकालात शहरवासीयांसाठी त्यांनी चांगले योगदान दिले आहे. पाण्याच्या प्रश्‍नासह रस्ते व अन्य मूलभूत सुविधा यावर त्यांनी विशेष लक्ष दिले होते व  त्याचा लेखाजोखा ते मांडत  आहेत. 

शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांनी यापूर्वी नगरसेवक तसेच पक्षाचे प्रतोद म्हणूनही ते होते. आपल्या प्रभागातील  त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावली होती. त्याची पोचपावती ते मतदारांकडे मागत आहेत. गेल्या वेळीही मेळेकर यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती पण ते पराभूत झाले होते. शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे. भाजप उमेदवार गोविंद चव्हाण हे पालिकेतील एकमेव नगरसेवक असून पाणी सभापती म्हणून कार्यरत आहेत. कडाक्याचा उन्हाळा असताना शहरात पाण्याचीटंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी जातीनिशी खबरदारी घेतली होती. या जोरावर हे तिन्ही उमेदवार आपआपले नशीब आजमावत असून खरा सामना हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस आघाडी असाच रंगणार आहे. 

ही निवडणूक शिवसेनेचे आमदार राजन साळवी व काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. येथील न.प.मध्ये शिवसेनेचे सतरापैकी सर्वाधिक 8 नगरसेवक असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणणे मोठी जबाबदारी आमदार साळवी व त्यांच्या सहकार्‍यांवर येऊन ठेपली आहे. गेल्यावेळी काँग्रेस आघाडीने नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे या वेळीही त्याची पुनरावृती करण्याची जबाबदारी आ. हुस्नबानू खलिफे यांच्यावर आहे. शिवाय त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. जमीर खलिफे  हे आघाडीचे उमेदवार असल्याने मोठी जबाबदारीही असल्याने त्या नागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला न जाता राजापुरात ठाण मांडून बसल्या आहेत.

प्रचारासाठी भाजप, सेनेचे दिग्गज येणार

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड व नुकतेच कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार निरंजन डावखरे येणार असल्याची चर्चा भाजप गोटातून ऐकायला मिळते. आ. राजन साळवी हे पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले असून तेही अधिवेशनाच्या सुट्टीच्या काळात राजापुरात प्रचारासाठी येतील, अशी माहिती सेना सूत्रांकडून मिळाली. खा. विनायक राऊतही राजापुरात येत आहेत.

चुरस कमालीची वाढली

निवडणुकीला आता काही दिवस शिल्लक असून प्रत्येक उमेदवाराची अद्याप पहिली फेरी पूर्ण झालेली नाही. मतदारांच्या वैयक्‍तिक गाठीभेटींसह सोशल मीडियाचाही प्रचारासाठी वापर होत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर राजापूर नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीला प्रचंड महत्त्व आले असून कमालीची चुरस वाढली आहे.