Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Konkan › रिफायनरीला विरोध, शिवसेना आमदाराला अटक

रिफायनरीला विरोध, शिवसेना आमदाराला अटक

Published On: Apr 19 2018 12:32PM | Last Updated: Apr 19 2018 10:03PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी सौदी अरेबिया सरकारशी केंद्र सरकारने सामंजस्य करार केल्याच्या विरोधात मनाई आदेश भंग करून केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन केल्याप्रकरणी आ. राजन साळवी यांच्यासह 31 जणांना गुरूवारी राजापुरात अटक करण्यात आली. त्यांना राजापूर न्यायालयात हजर केले असता वैयक्‍तिक 5 हजारांच्या जामिनावर मुक्‍तता करण्यात आली.

नाणारच्या रिफायनरी प्रकल्पावरुन जिल्ह्यात वातावरण तापले आहे. कोकणातील पर्यावरणावर विपरित परिणाम होईल, यामुळे प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. सामंजस्य करारानंतर 2 ते 16 एप्रिल दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी मनाई आदेश लागू केला होता.

केंद्र सरकारने सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठ्या ‘अरामको’ या तेल उत्पादन कंपनीशी सामंजस्य करार केला. यामध्ये या कंपनीची 50 टक्के भागीदारी राहणार आहे. या प्रकल्पात या कंपनीशी दीड लाख कोटींची गुंतवणूक राहणार आहे. या प्रकल्पाला शिवसेनेने सुरूवातीपासून तीव्र विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प लादणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अचानक प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या विरोधात राजापूरचे आ. राजन साळवी यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आणि शिवसेनेच्या वतीने जोरदार निषेध नोंदवला. मनाई आदेश लागू असताना आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी आ. राजन साळवी यांच्यासह 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना गुरूवारी पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी आ. राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, माजी सभापती कमलाकर कदम, सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्‍विनी शिवणेकर, माजी सभापती व विद्यमान जि. प. सदस्या सोनम बावकर, माजी उपसभापती उमेश पराडकर, सेनेचे उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, प्रफुल्ल लांजेकर, शरद लिंगायत, अभिजीत तेली, शहर प्रमुख संजय पवार, महिला आघाडीप्रमुख योगीता साळवी, प्रमिला कानडे, पौर्णिमा मासये, विशाखा लाड, विश्‍वनाथ लाड, वसंत जड्यार, अजिम नाईक, राजन कुवळेकर, अजित नारकर, राजा काजवे, संतोष हातणकर, संतोष कदम, विवेक मांडवकर, प्रशांत गावकर, करुणा कदम, मधुकर बाणे, बाळकृष्ण हळदणकर, समीर चव्हाण, प्रकाश गुरव व दिनेश जैतापकर यासह 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांपैकी दिनेश जैतापकर व योगीता साळवी वगळता उर्वरित एकतीस जणांना  राजापूर पोलिसांनी अटक केली. गुरूवारी दुपारी आ. राजन साळवी यांच्यासह 31 जणांना राजापूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या वैयक्‍तिक जामिनावर मुक्‍तता केली.