Fri, Jul 19, 2019 18:19होमपेज › Konkan › शिवसेना उपशहरप्रमुखाच्या गाड्यांची कणकवलीत तोडफोड

शिवसेना उपशहरप्रमुखाच्या गाड्यांची कणकवलीत तोडफोड

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:09PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

कणकवली शहरातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रमोद बाबाजी मसुरकर यांच्या ‘पमाज’ कॉम्प्लेक्ससमोर उभ्या असलेल्या बोलेरो आणि फोक्सव्हॅगन या दोन गाड्यांच्या समोरील काचा कोणीतरी अज्ञाताने दगड मारून फोडल्या. यात प्रमोद मसुरकर यांचे सुमारे 80 हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास घडली. प्रमोद मसुरकर यांनी याबाबतची फिर्याद कणकवली पोलिसांत दिली आहे. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलिस स्टेशननजीक आचरा मार्गाच्या बाजूला प्रमोद मसुरकर यांचे कॉम्प्लेक्स आहे.

तेथेच त्यांनी घरासमोर गाड्या उभ्या करून ठेवल्या होत्या. रात्री दीडनंतर कुणी अज्ञाताने त्यांच्या या गाड्या फोडल्या.  दरम्यान, प्रमोद मसुरकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपले सर्वांशीच सलोख्याचे संबंध आहेत, कुणीही आपला शत्रू नाही, तरीही झालेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ही घटना समजताच शिवसेनेेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी प्रमोद मसुरकर यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन सावंत, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश भोेगले, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, शहरप्रमुख शेखर राणे, सुजीत जाधव उपस्थित होते. 

प्रमोद मसुरकर हे कणकवली तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष आहेत. भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष अतुल बंगे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. जिल्ह्यातील भंडारी समाजातील व्यक्‍ती कुठल्या पक्षात समाजकार्य करत आहे हे ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे. परंतु भंडारी समाजाच्या व्यक्‍तीला राजकीय पटलावरून नामशेष करण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. जिल्ह्यातील भंडारी समाज प्रमोद मसुरकर यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे.