Fri, Jul 19, 2019 14:21होमपेज › Konkan › शिरोडा उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक धारेवर

शिरोडा उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक धारेवर

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:32AMवेंगुर्ले : प्रतिनिधी

 शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मिळणार्‍या अपुर्‍या सेवांबद्दल शिरोडा पंचक्रोशी आरोग्य सेवा संघर्ष समिती आक्रमक होत पं. स. सदस्य सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना घेराव घालत धारेवर धरले. पोलिस प्रशासनासमोर रुग्णांच्या होणार्‍या गैरसोईचा पाढा वाचत जि. प.  आरोग्य सभापती व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर निशाणा साधला
शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मिळणार्‍या अपुर्‍या सेवेबाबत सोमवारी शिरोडा पंचक्रोशी आरोग्य सेवा संघर्ष समितीने रुग्णालयात आंदोलन करत वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांना धारेवर धरले. रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावे, बंद शवगृह तात्काळ सुरू करावे,  गेली तीन वर्षे गोळ्या व औषधे रुग्णांना उपलब्ध होत नाहीत, याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी. रुग्णालयात रक्तपेढी  सुरु करावी, वैद्यकीय सेवा तात्काळ सुरळीत करावी आदी मागण्यांबाबत समितीने वैद्यकीय अधिकार्‍यांना जाब विचारला. 

रुग्णालयात डॉक्टरांची सात पदे असताना चार पदे रिक्त असून तीन डॉक्टर कार्यरत आहेत. डॉ. वजराठकटर हे सर्जन, डॉ. देसाई बालरोगतज्ञ तर डॉ. उदगिरकर नेत्रतज्ञ आहेत. मात्र ओपीडीच्या वेळेला ते तीनही डॉक्टर उपस्थित नसतात. आठवड्यातील सात दिवसांमधील दोन-दोन दिवस या डॉक्टरांनी वाटणी करून घेतल्याने जर अचानक एखादा रुग्ण संबंधित डॉक्टर यांच्याकडे आला व ते उपस्थित नसले तर काय करायचे? असा सवाल करत भाई परब यांनी  कायमस्वरूपी डॉक्टरांची मागणी केली. क्षुल्लक कारणांसाठी रुग्णांना बांबुळीला पाठवले जाते. मग याठिकाणची आरोग्य यंत्रणा काय काम करते असा प्रश्‍नही  केला.  

आरोग्य सभापतींच्या मतदार संघातील रुग्णालयाची ही दयनीय अवस्था असताना या आंदोलनाबाबत निवेदन देऊनही  आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आरोग्य सभापती न आल्याने भाई परब यांनी  सभापती प्रितेश राऊळ यांच्यावर  निशाणा साधला. यावेळी समितीने रस्ता रोकोचा इशारा दिल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर समितीचे हे आंदोलन मागे घेण्यात आले. 1 ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास 2 ऑक्टोबरला रुग्णालय बंद आंदोलन करणार असून त्यावेळी रुग्णांच्या होणार्‍या गैरसोईला आरोग्य यंत्रणा जबाबदार राहील, असा इशारा श्री.परब यांनी दिला.  ग्रा.पं. सदस्य नीलेश उर्फ आबा मयेकर, विशाखा परब, प्राची नाईक, गुणाजी आमरे, ग्रा.पं. आरोग्य समिती सदस्य शीतल साळगांवकर,  व ग्रामस्थ उपस्थित होते. 

पुढील एका आठवड्यात एक वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात कार्यरत होतील, रक्तपेढी कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण लावून उपलब्ध साहित्य सामुग्रीची पूर्तता 2 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल व त्यांनतर एफडीएचे प्रमाणपत्र आल्यानंतर त्वरित एक आठवड्यात रक्तपेढी सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन वैद्यकीय अधिकारी डॉ. वजराठकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.