Fri, Jul 19, 2019 15:42होमपेज › Konkan › गुहागरातील काताळेत उभारणार जहाज दुरुस्ती प्रकल्प

गुहागरातील काताळेत उभारणार जहाज दुरुस्ती प्रकल्प

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:23PMशृंगारतळी : वार्ताहर

मुंबई बंदर सोडून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर गोव्यासह कोठेही जहाज तोडण्याचा प्रकल्प नसल्याने या क्षेत्रातील मोठी अडचण आता दूर होणार आहे. मे. मरिन सिंडिकेट प्रा. लि. या कंपनीमार्फत कोकण किनारपट्टीवरील गुहागर तालुक्यातील काताळे बंदरात जहाज दुरूस्ती आणि जहाज तोडणीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यांत मोठा रोजगार निर्माण करणार्‍या या प्रकल्पाची जनसुनावणी ही आचारसंहितेमुळे सध्या पुढे ढकलण्यात आलेली आहे.

गुहागर तालुक्यातील पडवे, काताळेच्या समोर जयगड येथील  लागवण बंदरात जगातील मोठी जहाजे उतरण्याची सोय असणारे बंदर विकसित करण्यात आले आहे. नजीकच्या काळात बंदरात आलेला माल वाहून नेण्यासाठी रेल्वे लाईन टाकणेही प्रस्तावित आहे. रत्नागिरी येथे ‘भारती शिपयार्ड’ हा जहाजे दुरूस्त करणारा प्रकल्प आहे. मुंबईमधील रे रोड, माझगाव परिसरातील दारूखाना विभागात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या क्षेत्रावर जुनी जहाजे तोडण्याचा व्यवसाय चालतो. परंतु, यातील दारूखाना येथील जहाज तोडणीची सुविधा बंद पडण्याच्या स्थितीत आहे.

जुनी झालेली जहाजे तोडणे व दुरूस्त करणे मोठ्या विकसित बंदरात अत्यंत महागडे झाले आहे. यासाठी पर्यावरणाच्या द‍ृष्टीने उपयुक्‍त  व खर्चाच्या द‍ृष्टीने परवडणारा जहाज तोडणी प्रकल्प कोकण किनारपट्टीवर आल्यास तो सर्वतोपरी फायद्याचा ठरेल याद‍ृष्टीने मरीन सिंडीकेट कंपनीने काताळे येथील समुद्रात जहाज तोडणी सुविधा विकास व मालवाहतूक  प्रकल्प आणण्याचे निश्‍चित केले आहे. काताळे येथील 7.25 एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहणार आहे. परंतु, गोवा आणि कोकणात जहाज तोडण्याची सुविधा नसल्याने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. 

भारतातील जहाज तोडणी कामकाज सागरी क्षेत्रातील 45000 जहाजांपैकी सुमारे सातशे जहाजे दरवर्षी सेवेतून मुक्‍त होत असतात. पंचवीस वर्षांच्या वापरानंतर जुनी जहाजे वापरणे आर्थिकद‍ृष्ट्या परवडत नाही व सुरक्षितहि ठरत नाहीत. जहाजांच्या सागरी आयुष्याखेर विक्रीनंतर सुमारे 95 टक्के वजनाचे किमती लोखंड पुनर्वापरासाठी उपलब्ध होते. यामध्ये इंजिन इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा प्रत्यक्षपणे पुनर्वापर करता येऊ शकतो. दिवे टीव्ही किचन फिटिंग बेंचेस यासह सर्वच वस्तूंचा पुनर्वापर करणे शक्य असते.

प्रकल्पामध्ये एकावेळी एकच जहाज तोडले जाणार आहे. 150 मीटर लांब व 5 मीटर ड्राफ्टच्या जहाजांची तोडणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वर्षाला दहा ते पंधरा लहान जहाजे किंवा बार्जेस सुटी करून ती तोडण्यात येणार आहेत. जहाजांना किनार्‍यावर बांधून ठेवण्यासाठी खुंटे तयार करण्यात येणार आहेत. भाग सुटे करण्यासाठी येणारी लहान जहाजे आणि बार्जेस या टर्मिनलच्या उथळ पाण्यामध्ये खेचून घेण्यात येतील. जहाज तोडणीसाठी 5 हजार चौरस मीटर जलक्षेत्र वापरण्यात येणार आहे. 

मरिन नियमाप्रमाणे तेल पाण्यात सोडण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. तेल आणि पाणी यांचे विभागणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा जहाजावर असते. जहाजातील केवळ दहा लाख लि. मध्ये 12 पी. पी. एम पाणी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक पाणी सोडल्यास यंत्रणा बंद पडते. त्यामुळे खाडी प्रदूषित होण्याचा कोणताही धोका उद्भवत नाही. 

जहाजातील तेल खाडीच्या पाण्यात मिसळून त्यामुळे खाडी प्रदूषित होईल, असा समज असतो परंतु, जहाज येण्यापूर्वीच कोणत्या टाकीत तेल ठेवायचे याचे मोजमाप केलेले असते. चांगले तेल एका किनार्‍यावर असलेल्या टाकीत ठेवले जाते तर जळलेले तेल वेगळ्या टाकीत काढले जाते. याचा वापर डांबर अथवा ग्रीस बनविण्यासाठी केला जातो. जहाज तोडणीकरिता कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये, यासाठीची उपाययोजना मे मरिन सिंडिकेट प्रा. लि. या कंपनीने केली आहे.

गुहागर तालुक्यातील आठ व रत्नागिरी तालुक्यांतील नऊ ग्रा.पं.ना या सुनावणीची माहिती देण्यात आली आहे. परंतु, कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अचानक लागल्याने ही जाहीर जनसुनावणी लांबणीवर पडली आहे.