Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Konkan › रिफायनरी-अणुऊर्जाविरोधी वातावरणाला शिमगोत्सवात बळ

रिफायनरी-अणुऊर्जाविरोधी वातावरणाला शिमगोत्सवात बळ

Published On: Mar 08 2018 10:35PM | Last Updated: Mar 08 2018 10:33PMराजापूर : प्रतिनिधी

निसर्गरम्य कोकण आमुचा सौंदर्याची खाण
तिला नष्ट करण्या केले राजकारण ।
प्रकल्प आणतील पुढे मिळवण्यासी धन 
अणुऊर्जा, रिफायनरीचे आहे हे कारण ॥

अशा गीतातून आता नाणार रिफायनरी आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी वातावरणाला शिमगोत्सवातून बळ दिले जात आहे. यापूर्वी स्वातंत्रोत्तर काळासह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला अधिक  बळ मिळावे, यासाठी जनजागृतीच्या कार्यक्रमांतून गीते सादर केली जात असत. तशाच प्रकारचे गीत आता अणुऊर्जा आणि रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा, म्हणून प्रकल्प परिसरात शिमगोत्सवात सादर केले जात आहे.

शासनाने कोकणावर जैतापूर अणुऊर्जा आणि  नाणार रिफायनरी प्रकल्प लादला आणि त्याचे जोरदार  पडसाद नाणार, सागवे परिसरात उमटत आहेत. त्या प्रकल्पाचे जोरदार धक्के थेट विधानसभेसह संसद भवनाला देखील बसत आहेत. महाराष्ट्र विधीमंडळात तर रणकंदन पहावयास मिळत आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवर 14 प्रकल्पग्रस्त गावांतून प्रखर  विरोध कायम आहे. त्यामध्ये शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, कष्टकरी यासह सर्व जनता विरोधात उभी ठाकली आहे. एकजुटीतून जैतापूर अणुऊर्जा  व  नाणार रिफायनरी रद्द व्हावा, म्हणून प्रयत्न सुरु आहेत. पण शासन आपला हेका सोडायला तयार नसल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी विविध प्रकारे विरोध सुरूच ठेवला आहे. या गाण्यामध्ये विरोधाची व्यूहरचनाही दाखवली आहे. 

एकजुटीने चला करुया रिफायनरी हद्दपार
वायु पसरवुनी प्रदूषण होईल कोकणात फार। रस्त्यावरती येती दादा न बागायतदार
दिसेनासे होतील पुढे आंबा काजूगर ॥

सध्या  शिमगोत्सव सुरु असल्याने या प्रकल्पाच्या विरोधात बोंबा मारण्याचे आंदोलन झाले. त्याचवेळी प्रकल्पाची होळी पेटवण्यात आली. त्यानंतर आता प्रकल्पाविरोधात गीते सादर करुन जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणमन मौजे चौके येथील एका शाहिराने ‘रिफायनरी हटाव’वर गीत बनवून ते गोमुच्या नाचातून  गावात अनेक ठिकाणी गायल्याने अनेकांचे कान त्याकडे टवकारले गेले.

दलाल दावती आम्हाला पैशाचे आमिष 
पाहून त्या मायेला नका होवू तुम्ही खुष ।
पैसे घेवून विकू नका त्या जन्मदात्या माऊलीस
तिच तुम्हाला सुखी ठेवून लावील शेवटास ॥

यापूर्वी स्वातंत्रोत्तर काळात व संयुक्त महाराष्ट्र लढ्यात जनजागृती करण्यासाठी पोवाडे यासहित विविध गीते गायली जायची. त्यातूनच लोकांपर्यंत ते विचार जाऊन पोचायचे व लढ्याला व्यापकता यायची. त्याकाळी प्रबोधनात्मक गायलेली गीते अजरामर ठरली होती. तशाच पद्धतीने रिफायनरी हटावासाठी   शिमगोत्सवातून गीत गायले जात आहे.

जलचर प्राणी मरुन जातील त्यांचे नाही खरं
मच्छी व्यवसाय कसा करील सांगा मच्छीमार ।
गावर्‍यावान देवून आमंत्रण करावा विचार
म्हणे सर्व मिळुन चला जावुया पोलीस ठाण्यावर॥

विविध मार्गाने आंदोलने करुन कोकणला घातक ठरणारा रिफायनरी प्रकल्प रद्द करायला शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार प्रकल्पग्रस्त गावांतून करण्यात आला आहे. यापूर्वीच्या प्रत्येक आंदोलने असोत वा लढे असोत त्या गीतांनी जशी मोठी कामगिरी बजावली तशाच प्रकारचे काम जैतापूर अणुऊर्जा व रिफायनरी हटाव प्रकल्पासाठी गायले गेलेले  गीत करेल का?  हाच खरा सवाल आहे.