Tue, Jun 18, 2019 20:30होमपेज › Konkan › ...अन् भावा-बहिणींच्या भेटीसाठी देव आले मांडावर!

...अन् भावा-बहिणींच्या भेटीसाठी देव आले मांडावर!

Published On: Mar 05 2018 8:51PM | Last Updated: Mar 05 2018 8:23PMखारेपाटण : रमेश जामसंडेकर

इतिकाळ काळात तळकोकणातील एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेेला खारेपाटण गाव  आगळया-वेगळया सण- उत्सवांसाठीही प्रसिद्ध आहे. येथे साजरा होणारा कुठलाही पारंपरिक सण हा वैशिष्टयपूर्ण असतो. येथे साजर्‍या होणार्‍या शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी आणि देव वर्षातून एकदा आपल्या भावा-बहिणींसाठी पालखीतून बसून खारेपाटण दर्शनासाठी येतात. फार वर्षांपासून चालत आलेली ही देवाची प्रथा 21 व्या  शतकातही टिकून आहे.

शिमगोत्सवात खारेपाटणमध्ये प्रथम ग्रामदैवत वायंगणी आदीनाथ,त्यानंतर गुंजवणे ता.राजापूर गांगेश्‍वर,निनादेवी पन्हाळे (ता.राजापूर),विठू महाकाली (कुंरगवणे) ही सर्व ग्रामदैवते 7  खेडयांच्या राजाच्या दर्शनानंतर मांडावर दाखल झाले. ग्रामदैवत निनादेवी व ग्रामदैवत विठू महाकाली देवीची गाठ भेट देवाच्या समोर घडली. रविवारी पहिल्या दिवशी 4 ग्रामदैवते देव चव्हाटा येथे एकत्र आली. ढोल-ताश्यांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणुकीसह भाविक पालख्या घेवून नाचत होते.

भाविकांनीही होळीभोवती फेर धरला.त्यानंतर चव्हाटयावर धुपारत गार्‍हाणी गाठी भेटीचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने खारेपाटण शहरात भक्‍तिमय वातावरण निर्माण झाल होते. संपूर्ण शहर पालख्यांच्या आगमनाने दुमदुमून गेले होते. शिमगोत्सवानिमित्त संपूर्ण गावात पालखी प्रदर्शना होते. नारळ खणांनी ओटी भरली जाते. गार्‍हाणी होतात. पालखी नाचविली जाते. पालखी नाचविण्याच्या आगळया-वेगळया पद्धती अतिशय चित्‍तथरारक असतात. देवाची पालखी अंगावर, खांद्यावर, डोक्यावर घेवून भाविक उत्सवातील भक्‍तिरसाशी एकरूप होवून नाचू लागतात आणि पाहणारेही त्यात तल्‍लीन होवून जातात. 

देवांच्या गाठी-भेटी झाल्यावर पालखी नाचवणारे भाविक हातात हात देवून निरोप घेतात. एकमेकांना नारळ देतात. निशान भेट होते. या पालखी मिरवणुकीसाठी शेकडो नागरिक पायी चालत आपआपल्या गावातून पालखी बरोबर येतात.शिमगोत्सवासाठी  चाकरमानी देखील गावात दाखल झाले असून ते ही या उत्सवात मोठया उत्साहाने सहभागी झाले आहेत.