Mon, Jul 22, 2019 05:31होमपेज › Konkan › लक्षवेधी देखावे, सोंगांसह नेरुर येथे रंगला शिमगोत्सव

लक्षवेधी देखावे, सोंगांसह नेरुर येथे रंगला शिमगोत्सव

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 8:50PMकुडाळ : काशिराम गायकवाड

उंचच उंच लक्षवेधी हालते देखावे...विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण आणि त्याला रसिक प्रेक्षकांची दाद अशा उत्साही वातावरणात शनिवारी रात्री नेरूर-सायचेटेंब येथे शिमगोत्सवातील प्रसिद्ध मांड उत्सव साजरा झाला. उत्तरोत्तर रंगलेल्या या सोहळ्यात विविध कलांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फिटली. थक्क करणार्‍या सोहळ्याला सिंधुदुर्गासह जिल्ह्याबाहेरील रसिक - प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 

कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात होणार्‍या शिमगोत्सवातील एक आगळावेगळा शिमगोत्सव म्हणजे नेरुर येथील 5 दिवसांचा शिमगोत्सव आणि त्यातील मांड उत्सव. यातील खास आकर्षण होळीच्या तिसर्‍या दिवशी श्री गावडोबा मंदिर येथून गावडे समाजाचे श्री देव कलेश्‍वराच्या भेटीला येणारे गोडे रोंबाट व त्यानंतर या रोंबाटाच्या परतीच्या वाटेवर नेरुर सायचे टेंब येथे होणारा मांड उत्सव. गावडे समाजाचे हे गोडे रोंबाट नेरुर माड्याचीवाडी श्री गावडोबा मंदिर येथून सायंकाळी 4 वाजता निघून श्री देव कलेश्‍वर मंदिर येथे 7 ते 7.30 वाजता देवाच्या भेटीला येते. देवहोळीची भेट घेवून श्री देव कलेश्‍वराला श्रीफळ ठेवून देवाला भेट दिल्यानंतर काही वेळानंतर हे रोंबाट परतीच्या प्रवासाला निघते. परतीच्या वाटेवर बाराचा चव्हाटा तसेच इतर ठिकाणी देवाच्या तळीचे दर्शन व गुळाचा नवस करणे, नवस फेडणे व गार्‍हाणी होतात. 

त्यानंतर हे रोंबाट नेरुर सायचे टेंब येथे रात्री साधारण 10.00 वाजता सुतार, मडवळ व इतर समाजाची नवसाच्या व इतर गार्‍हाणी यासाठी थांबते. हा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सायचेटेंब येथे पार पडलेल्या मांड उत्सवात विविध देखाव्यांसह कलांचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले. 

येथे कै.आना मेस्त्री यांचे सहकारी तसेच विलास मेस्त्री, दिनू मेस्त्री व बाबा मेस्त्री यांच्या संघाने यात सहभाग घेतला. या संघांनी वेगवेगळ्या पौराणिक कथा- साहित्यावर आधारित मोठमोठ्या हालत्या देखाव्यांचे सादरीकरण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. याचबरोबर पारंपरिक वेशभूषा केलेली सोंग (मारुती, राक्षस,गरूड, वाघ, पक्षी व प्राणी आणि सोबत हातात लेझीम घेवून लहान मुलांचे नाचे)याचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. सुश्राव्य संगीत साथीवर एकापेक्षा एक सरस अभंगांच्या तालावर हे सर्व कलाकारांनी बेभान होऊन तालात नाचत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रात्री उशिरापर्यंत हा अविस्मरणीय सोहळा उत्तरोत्तर रंगला. हा मांड उत्सवाचा थक्क करणारा नेत्रदीपक सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह जिल्ह्याबाहेरील रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती.