Mon, Apr 22, 2019 03:59होमपेज › Konkan › चिपळूण न. प. विरोधी गटनेते  शशिकांत मोदी यांचा राजीनामा

चिपळूण न. प. विरोधी गटनेते  शशिकांत मोदी यांचा राजीनामा

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 8:43PM

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

‘एलईडी’च्या मुद्द्यावरून शिवसेनेने विशेष सभेची मागणी करून ऐन ठरावाच्यावेळी तोंडघशी पडल्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे. अखेर अनेक बैठका आणि चर्चानंतर न.प.चे विरोधी गटनेते शशिकांत मोदी यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे शिवसेनेने सभागृहातील झालेली नाचक्की गंभीरतेने घेतल्याची चर्चा आहे.

दोन दिवसांपूर्वी शहरातील एलईडी योजनेला विरोध करण्यासाठी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. मात्र, या सभेत शिवसेना नगरसेवकांनी विरोधात मांडलेला ठराव अकरा विरुद्ध बारा मतांनी फेटाळून लावण्यात आला. या प्रकारानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाली. विशेष सभा संपल्यानंतर गटनेते मोदी आणि नगरसेवक मोहन मिरगल, उमेश सकपाळ व अन्य सेना नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सभागृहात तोंडघशी पडल्याने हे अपयश सेनेच्या जिव्हारी लागले आहे. अनेक दिवस विरोध करून ऐन ठरावाच्या वेळी फासे उलटे पडल्याने सेनेमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. 

अंतर्गत वाद टोकाला

विशेष सभेत ठरावाच्या मतदानावेळी भाजपने खेळलेली चाल शिवसेनेच्या अंगलट आली आणि त्यांच्या अंतर्गत असलेले गट-तट या निमित्ताने समोर आले आहेत. यातून नगर परिषदेत गटनेते मोदी यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच विरोधात पक्षांतर्गत असलेल्या नगरसेवकांनी दंड थोपटले असून अंतर्गत वाद टोकाला गेला आहे. 

आ. सदानंद चव्हाण यांनी सेना नगरसेवकांच्या लागोपाठ बैठका घेतल्या. यावेळी सभेला गैरहजर राहणार्‍या आणि विशेष सभेतून अचानक सभात्याग करणार्‍या सेनेच्या दोन महिला नगरसेविकांना जाब विचारण्यात आला व त्यांचाही राजीनामा मागविल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणी अखेर शिवसेना गटनेते मोदी यांना जबाबदार धरले आहे आणि पक्षश्रेष्ठींकडून पक्षशिस्तीचा भाग म्हणून त्यांचा राजीनामा मागविण्यात आला. अखेर मोदी यांनी रविवारी दुपारी आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा आ. सदानंद चव्हाण व शहरप्रमुख राजू देवळेकर यांच्याकडे सुपुर्दु केला आहे. 

या संदर्भात राजीनामा दिल्यानंतर मोदी म्हणाले, शिवसेनेच्या दृष्टीने न. प.ची विशेष सभा महत्त्वाची होती. आपण गटनेते म्हणून विरोधी पक्षाची दोन मते घेण्यात यशस्वी झालो. मात्र, स्वपक्षातील दोन मते मिळविण्यात अपयश आले. ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण गटनेतेपदाचा राजीनामा देत आहोत.