Sat, May 25, 2019 23:25होमपेज › Konkan › ‘रिफायनरी रद्द’साठी ग्रामस्थांचे गार्‍हाणे

‘रिफायनरी रद्द’साठी ग्रामस्थांचे गार्‍हाणे

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 8:26PMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस तीव्र विरोध होत आहे. शिमगोत्सवाच्या प्रारंभीच कात्रादेवीवाडीच्या होळदेवाला नाणार परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी गार्‍हाणे घालण्यात आले. येथील ग्रामस्थांनी हा रिफायनरी प्रकल्प हटविण्यासाठी होळीला बारा पाचाचा जाप घालत बोंबा मारल्या. तसेच हा प्रकल्प हटविण्यासाठी सर्वांना सुबुध्दी द्यावी, असे गार्‍हाणे गावच्या देवाला घातले.

कोकणातील शिमगोत्सवाला मोठ्या धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. नाणार गावासह परिसरातील 14 गावांमध्ये होऊ घातलेल्या विनाशकारी रिफायनरी प्रकल्पावरून या गावातील वातावरण तापले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिमगोत्सवामध्ये प्रतिकात्मक रिफायनरीचीच होळी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी येथील अनेक गावांमध्ये गावहोळीचा उत्सव साजरा करण्यात आला.

नवसाला पावणारी होळी म्हणून ख्याती असलेल्या कात्रादेवीवाडी येथील होळीला रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी साकडे घालण्यात आले. कोकणी चाकरमानी गणपतीनंतर शिमग्यालाच मोठ्या प्रमाणात कोकणात येत असतो. सध्या नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पामुळे या परिसरात शिमगोत्सवापूर्वीपासूनच दररोज शिमगा सुरू झाला होता. शिमगोत्सवामधील होळीदिवशी जशा फाका मारल्या जातात तशाच काहीशा फाका राजकारणी लोक रिफायनरी संदर्भात एकमेकांच्या विरोधात मारताना दिसत आहेत.

गेले काही महिने रिफायनरीबाधित सर्व गावांमध्ये विविध माध्यमातून कोकणभर रिफायनरी आणि तिचे दुष्परिणाम पोहोचवून काही प्रमाणात जनजागृती केली आहे. आजही जनजागृती केली जात आहे. शिमगोत्सवामध्ये रिफायनरीची होळी करण्याचा मानस येथील ग्रामस्थांचा होता. याची सुरूवात सागवे गावातील प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. उद्योगमंत्र्यांनी रिफायनरी होण्याचे संकेत विधानसभेत दिले असल्याने येथील प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे.

यावेळी येथील प्रकल्पग्रस्तांनी होळीकडे साकडे घालताना जे कोणी या प्रकल्पाला समर्थन देत आहेत त्यांना सुबुध्दी देऊन हा प्रकल्प रद्द होण्याकरिता त्यांची मानसिकता बदलावी, असे गार्‍हाणे घालण्यात आले आहे. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जोरदार फाक मारत बोंबा मारण्यात आल्या. एकंदरित रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा, अशी मागणाी नाणार परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.