Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Konkan › ‘मी नथुराम...’ने आयुष्यच बदलून टाकले

‘मी नथुराम...’ने आयुष्यच बदलून टाकले

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 9:57PMरत्नागिरी : प्रतिनिधी

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकासाठी मी  अवघ्या दहा मिनिटांत केेलेली तयारी पाहून दिग्दर्शक विनय आपटे यांनी माझी भूमिका मनात पक्की केली. या नाटकातील भूमिकेने आपले आयुष्यच बदलून टाकल्याचे  ‘नथुराम’फेम शरद पोंक्षे यांनी येथे प्रकट मुलाखतीत बोलताना सांगितले.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि चतुरंगतर्फे शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात रविवारी ही मुलाखत घेण्यात आली. या नाटकातील सहअभिनेते विवेक जोशी यांनी पोंक्षे यांची मुलाखत घेतली. येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात या नाटकाच्या प्रयोगासाठी आले असता प्रकट मुलाखतीचा हा कार्यक्रम झाला. गेली 20 वर्षे रंगमंचावर गाजणारे आणि सदैव हाऊसफुल्ल होणारे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगमंचावरून एक्झिट घेणार आहे. येत्या 11 मार्चला अखेरचा प्रयोग होणार असल्याची घोषणा शरद पोंक्षे यांनी केली. 

नथुराम’चे 1998 पासून हजार प्रयोग झाले. अनेकदा संघर्ष झाला तरी एकही प्रयोग रद्द केला नाही. कणकवली, चंद्रपूर येथील प्रयोगात विरोधकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले. पण, रसिकांनी कोणताही गोंधळ न करता नाटक पाहणारच व तुम्ही ते पूर्ण करणारच हा विश्‍वास दिल्याने आजवर कोणताही प्रयोग रद्द केलेला नाही. यावेळचा कोकणचा हा शेवटचा दौरा आहे. दोन्ही प्रयोग हाऊसफुल्ल असून असे ‘हाऊसफुल्ल’ असतानाच थांबलेलेच चांगले! असेही पोंक्षे यांनी सांगितले. दि. 11 मार्चला मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चा शेवटचा प्रयोग होणार आहे. ‘नथुराम’ नाटक ज्यांना करायचे आहे ते करू शकतात. त्यांना  आपण योग्य मार्गदर्शनही करू, पण संहितेला धक्का लागता कामा नये. गेल्या वीस वर्षांचा दर्जा सांभाळूनच नाटक केले पाहिजे. या नाटकाच्या डीव्हीडी केल्या आहेत. हे नाटक पाहता येईल, असे पोंक्षे म्हणाले.

पोंक्षे यांनी ‘नथुराम’मधील भूमिका कशी मिळाली ते सांगितले. पोलिसाच्या भूमिकेसाठी वाचन केले. तू चांगलं वाचतोयस, ‘नथुराम’ वाचून दाखव. कठीण आहे, तयारी करावी लागेल, असे दिग्दर्शक आपटे यांनी सांगितले. दहा-पंधरा मिनिटांत तयारी करून वाचून दाखवला आणि आपटे यांनी माझी भूमिका मनात पक्की केली आणि या भूमिकेने आयुष्यच बदलले.