Wed, Jul 17, 2019 20:29होमपेज › Konkan › शहीद मेजर कौस्तुभ राणेंचा अस्थिकलश सिंधुदुर्गात

शहीद मेजर कौस्तुभ राणेंचा अस्थिकलश सिंधुदुर्गात

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 10:30PMवैभववाडी : वार्ताहर

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांचा  अस्थिकलश दर्शनासाठी सोमवारी वैभववाडी येथे आणण्यात आले. ‘वंदे मातरम, कौस्तुभ राणे अमर रहे! शहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे...अमर रहे! जब तक सूरज, चाँद रहेगा, वीर जवान तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी वैभववाडी शहर दुमदुमून गेले.  पोलिस प्रशासनाच्या वतीने अस्थिकलशाला मानवंदना देताना तमाम नागरिकांना अश्रू अनावर झाले. 

काश्मीरमार्गे हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या दहशतवाद्यांशी लढताना वैभववाडीचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. पाकिस्तानी लष्कराने उखळी तोफा डागून या दहशतवाद्यांना कव्हर दिले होते. तोफांचा मारा आणि बेछूट गोळीबारातही मेजर राणे यांनी पराक्रमाची शिकस्त केली. घुसखोरी करणार्‍या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या धुमश्‍चक्रीत राणे यांच्यासह तीन जवान शहीद झाले. 

मेजर कौस्तुभ राणे मूळचे वैभववाडीचे सुपुत्र. त्यांचे घर मीरारोड येथील शीतल नगरातील हिरल सोसायटीमध्ये आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी आणि अडीच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. यावर्षीच कौस्तुभ राणे यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी लेफ्टनंट, कॅप्टन अशी पदे भूषविली. त्यानंतर त्यांना मेजर पदावर बढती मिळाली. दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह सिंधुदुर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुकावासीयांना अस्थिकलशाचे दर्शन मिळावे याकरिता त्यांच्या नातेवाईकांनी मुंबईहून अस्थिकलश वैभववाडीत आणला.

सोमवारी सकाळपासूनच तालुकावासीयांनी अस्थिकलश दर्शनासाठी संभाजी चौकात गर्दी केली होती. अस्थिकलश ठेवण्यासाठी चौकात फुलांनी सजविलेला मंडप उभारण्यात आला होता.

अस्थिकलश करुळ येथे ग्रामस्थ व पोलिसांनी ताब्यात घेतला. या कलशाची करूळ ते वैभववाडी अशी  शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली. करुळ येथे विद्यार्थी व ग्रामस्थांनी कलशाचे सन्मानाने स्वागत केले. करुळ ग्रामपंचायत व एडगाव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर संभाजी चौकात दर्शनासाठी आणला. दर्शनासाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, आ.नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, अ. रा. विद्यालय, माधवराव पवार कोकिसरे, कृषी विद्यापीठ सांगुळवाडीतील विद्यार्थी व तमाम तालुकावासीयांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी 12.30 वा. वीर लक्ष्मण रावराणे स्मारक व आचिर्णे हायस्कूल, तेथून 1.30 वा.सांगुळवाडी कृषी महाविद्यालय येथे अस्थिकलश नेण्यात आला. तेथे पालकमंत्री दीपक केसरकर दर्शनासाठी उपस्थित होते.  2 वा. अरुळे हायस्कूल, 3 वा. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या घरी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला.  मंगळवार  हा कलश जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यात नेवून सायंकाळी कुणकेश्‍वर येथे विसर्जन करण्यात येणार आहे.