Mon, Jan 27, 2020 12:03होमपेज › Konkan › रत्नागिरीत बालिकेवर लैंगिक अत्याचार

रत्नागिरीत बालिकेवर लैंगिक अत्याचार

Published On: Jun 18 2019 1:34AM | Last Updated: Jun 17 2019 10:15PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरामध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार छत्रपती शिवाजी स्टेडियमवर घडला. आई-वडिलांनी सोडून दिलेल्या एका 9 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करताना एका विकृत तरुणाला पकडण्यात आले. या तरुणावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल  करुन त्याला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन-तीन दिवसापूर्वी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात तीन छोट्या बालकांना सोडून त्यांचे आई-वडील निघून गेले होते. यात नऊ वर्षाची बालिका, तिचा सहा वर्षाचा भाऊ व चार वर्षाची छोटी बहीण असे तिघेजण स्टेडियम परिसरात फिरुन, लोकांनी काही दिल्यावर खाऊन त्याच ठिकाणी वास्तव्य करीत होते. या भागात दारु पिऊन झोपणार्‍या विकास विठ्ठल पवार (34, मेर्वी) याची या बालकांवर  नजर होती. त्याने दोन दिवसांपूर्वी स्टेडियममध्ये झोपलेल्या नऊ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार एका व्यक्‍तीच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने याची कल्पना चाईल्ड लाईन व पोलिसांना देऊन या दारुड्याला पकडून ठेवले. या तिन्ही मुलांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

नऊ वर्षाच्या मुलीकडून पोलिसांनी माहिती घेत, विकृत तरुणावर भा.दं.वि.क. 376, व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण 2012 चे कलम 4,5(म),8 अन्वये गुन्हा दाखल केला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत. या पूर्वीही या तिघांना त्यांच्या पालकांनी मांडवी किनार्‍यावर सोडले होते. त्यावेळी पोलिसांनी मुलांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. मात्र पुन्हा एकदा या मुलांना असे वार्‍यावर पालकांना का सोडले हा पोलिसांसमोरही प्रश्‍न उभा ठाकला आहे.