Sun, Nov 18, 2018 07:07होमपेज › Konkan › सत्तर बहुजन निदर्शकांवर गुन्हे दाखल

सत्तर बहुजन निदर्शकांवर गुन्हे दाखल

Published On: Aug 23 2018 10:53PM | Last Updated: Aug 23 2018 10:34PMचिपळूण : खास प्रतिनिधी

शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या चिपळुणातील बैठक उधळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 70  बहुजन निदर्शनकर्त्यांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार जीवन देसाई यांची भेट घेऊन आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी संभाजी भिडे आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीदेखील केली.

बुधवारी (दि. 22) सायंकाळी शहरातील बन्या बापू चितळे सभागृहात संभाजी भिडे यांची धारकर्‍यांबरोबर बैठक झाली. 32 मण सोन्याचे सिंहासन व खडा पहारा अभियान या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही संघटनांनी ही बैठक उधळण्याचा प्रयत्न केला. नवा भैरी व जुना भैरी मंदिराजवळ जोरदार निदर्शने केली. बैठकीनंतर सभागृहाच्या दिशेने येणारे दोन्ही रस्ते अडविले व संभाजी भिडे व पोलिसांविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तब्बल पाच तास हा प्रकार सुरू होता. अखेर पोलिसांनी संभाजी भिडे यांची गाडी आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण ठेवत यशस्वीपणे बाहेर काढली. रात्री 10.30 वा. तणावपूर्ण शांतता होती. या प्रकरणी 50 ते 70 लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

जमावबंदी आदेश धुडकावून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस हेड कॉन्स्टेबल विशाल वायंगणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुभाष संभाजी जाधव (धामणवणे), प्रवीण राजाराम जाधव (वेहेळे), मुझफ्फर इसहाक मुल्लाजी, विनोद कदम, महेश सावंत, वैभव सावंत (सावर्डे), संदेश मोहिते, सुबोध सावंतदेसाई (खेर्डी), महेश धोंडीराम सकपाळ (धामणवणे), चंद्रकांत सावंत (चिपळूण), शक्‍ती जाधव (धामणवणे), सूरज जाधव, सचिन गमरे (खांदाट), प्रसन्‍न सुधाकर मोहिते (शिवाजीनगर), स्नेहल संजय चव्हाण (चिपळूण) यांच्यासह सत्तर जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.