होमपेज › Konkan › खेडसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर

खेडसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:01PMखेड : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या वतीने खेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने आवश्यक पदनिर्मिती करण्यासही मान्यताही दिली आहे. यामुळे खेडमध्ये चौथे न्यायालय होणार असून उत्तर रत्नागिरीतील दिवाणी स्वरूपाच्या खटल्यांना तातडीने न्याय मिळण्यास मदत होणार आहे.

या आधीच्या युती शासनाच्या काळात खेडमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली. यामुळे रत्नागिरी येथील जिल्हा सत्र न्यायालयावरील भार कमी झाला. उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यांसाठी हे जिल्हा सत्र न्यायालय कार्यरत झाले. तत्कालीन मंत्री व  विद्यमान पर्यावरणमंत्री ना. रामदास कदम यांनी जिल्हा सत्र न्यायालय खेडमध्ये होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता चौथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय खेडमध्येच येत आहे. 

खेड येथे दिवाणी न्यायालय, सहदिवाणी न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालय आहे. आता वरिष्ठ दिवाणी न्यायालय होत असल्याने उत्तर रत्नागिरीतील प्रलंबित असणार्‍या दिवाणी स्वरूपाच्या खटल्यांना न्याय मिळणार आहे. यामुळे लोकांचा प्रवास, वेळ आणि पैसा वाचणार आहे. या आधी दिवाणी स्वरूपाच्या खटल्यांसाठी रत्नागिरी येथे जावे लागत होते. ते आता खेडमध्येच निकाली निघणार आहेत. या निर्णयाचे ‘बार’ असोसिएशनने स्वागत केले आहे.