Fri, Jan 24, 2020 22:15होमपेज › Konkan › रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार

Published On: Nov 24 2018 1:21AM | Last Updated: Nov 23 2018 10:48PMकणकवली : प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल आणि राष्ट्रवादी या जागेवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देईल, अशा प्रकारच्या जाणिवपूर्वक बातम्या पसरविल्या जात आहेत. परंतु यात काहीच तथ्य नाही. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच लढविणार असून कार्यकर्त्यांचाही तसाच आग्रह आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापले मित्रपक्ष सहमतीनेच ठरवावेत असा निर्णय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने याठिकाणी स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानांतर्गत शुक्रवारी कणकवली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला डॉ. भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी राजन भोसले, माजी आ. सुभाष चव्हाण, विजय सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रेमानंद देसाई, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ टोमके, महिला काँग्रेस कार्यकारिणी सदस्या सौ. विभावरी सुकी, प्रांतिक सदस्य बाळा गावडे, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत, शहर अध्यक्ष विलास कोरगावकर, कणकवली मतदारसंघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष आतिष जेठे, काँग्रेस अनुसुचित जाती सेलचे राज्य उपाध्यक्ष संदीप कदम, महानंद चव्हाण, श्री. वरूणकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, मोदी सरकारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. दलित, शेतकरी, कष्टकरी, मजूर,कामगार असा कोणताच घटक या सरकारबद्दल आज समाधानी नाही. 2019 मध्ये मोदी आणि भाजप सरकारचा पराभव अटळ आहे.  सरकारबद्दल जनतेमध्ये असंतोष वाढला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे आर्थिक विकासाचा दर दोन टक्क्यांनी घसरला आहे. जाती-धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करून पुन्हा सत्तेत येण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. 1992 मध्ये बाबरी मशिद पाडल्यापासून राममंदिर बांधणार असे भाजपवाले सांगत आहेत. मात्र त्यांना प्रभू रामचंद्रांविषयी  आस्था नाही, केवळ रामाच्या नावावर सत्ता मिळविणे हेच त्यांचे ध्येय आहे. शहरांची नावे बदलण्यापलिकडे यांच्याकडे ठोस कार्यक्रम नाही, अशी टीका  डॉ. मुणगेकर यांनी केली.

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडली तेव्हा जिल्ह्यातील काँग्रेस संपली असे चित्र निर्माण केले होते. मात्र काँग्रेसच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काँग्रेस कधीही संपणार नाही हेच स्पष्ट आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित झाली असून परस्पर सहमतीनेच दोन्ही पक्षांनी आपापले मित्रपक्ष ठरवावेत असा निर्णय झालेला आहे. त्यामुळे राज ठाकरे असोत की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्‍न येत नाही. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले परंतु महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काम करणारे आ.नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. योग्यवेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही डॉ. मुणगेकर यांनी सांगितले. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या परंतु पक्ष विरोधी काम करणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याबाबत कायदेशीर बाबी पक्षाकडून तपासल्या जात असल्याचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अशाच विषयावर मुंबई उच्च न्यायालयाने तेथील गट रद्दबातल ठरविला आहे. हाच नियम येथेही लागू होतो. त्यांच्या  गट स्थापनेबाबत जरी गॅझेट झाले असले तरी प्रदेश स्तरावरील ज्या अ‍ॅथोरटीने एबी फॉर्मवर सही दिली होती, त्याने या गटाला मान्यता दिली होती का? हेही पाहणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

...तर काँग्रेस कार्यकर्ते वेगळी भूमिका घेतील
जर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जर राष्ट्रवादीकडे गेला आणि राष्ट्रवादीने या मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमानच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर काँग्रेस कार्यकर्ते कदापिही राष्ट्रवादी आणि स्वाभिमानला मदत करणार नाहीत. उलट या मतदारसंघात निवडून येवू शकणार्‍या दुसर्‍या उमेदवाराला पाठिंबा देतील, असे मत देवगड आणि कणकवली तालुका काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे आणि याविषयावर गरमागरम चर्चा झाल्याचे समजते.

बार्गेनिंग पॉवर वाढविण्यासाठीच ‘त्यांचा’ आटापिटा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या चर्चेबाबत  आपण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याबाबत  कोणतीही चर्चा झालेली नाही. काहीजण आपली बार्गेनिंग पॉवर वाढविण्यासाठी खोट्या बातम्या पसरवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा टोला राजन भोसले यांनी खा. नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.