होमपेज › Konkan › स्वयंरोजगारातून सक्षम बना

स्वयंरोजगारातून सक्षम बना

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 10:58PMचिपळूण : शहर वार्ताहर

शासनाच्या विविध उद्योग-व्यवसाय, योजनांच्या माध्यमातून कोकणातील महिलांनी रोजगार निर्मितीतून स्वबळावर उभे राहण्यासाठी इच्छाशक्ती ठेवावी व प्रयत्न करावेत, असे आवाहन समर्थ वूमेन्स वेल्फेअर असोसिएशनच्या संचालिका राजश्री विश्‍वासराव यांनी केले.

शहरातील अतिथी सभागृहात खादी ग्रामोद्योग आयोग व समर्थ वूमेन्स वेल्फेअर यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित उद्योजिकता प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, उपाध्यक्ष वामनराव पवार, तालुकाध्यक्ष सतीश मोरे, शहराध्यक्ष वैशाली निमकर, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या संचालिका प्रज्ञा जोगळेकर, माधवी माने आदी उपस्थित होते. 

शासनाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायातून रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खादी ग्रामोद्योग ही महत्त्वाची योजना आहे. कोकणातील ग्रामीण भागात असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून एकत्रितपणे व मेहनत करून रोजगार निर्मितीला या योजनेतून महिलांना फार मोठी संधी आहे, असे विश्‍वासराव म्हणाल्या.

कोकणी माणसाला सक्षम बनविण्यासाठी समर्थ वूमेन्स वेल्फेअर असो.च्या माध्यमातून जिल्हाभरात प्रमुख ठिकाणी उद्योजिकता प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. उपाध्यक्ष वामनराव पवार यांनी कोकणी माणसाने उद्योग, व्यवसायात योगदान द्यावे. उद्योगाच्या माध्यमातून कोकणी माणूस आपली ओळख निर्माण करेल. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे, असे सांगितले. प्रमुख पाहुणे बाळ माने यांनीदेखील कोकणी माणसाने उद्योगशील व्हावे. त्यातूनच रोजगार निर्मिती व स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण होऊन कोकणी माणूस स्वयंपूर्ण होईल, असे सांगितले.

शासनाच्या खादी ग्रामोद्योगच्या संचालिका जोगळेकर यांनी मागदर्शन करताना सांगितले की, पन्नास वर्षांपूर्वी शासनाने खादी ग्रामोद्योग बोर्ड व आयोगाची निर्मिती केली. या माध्यमातून देशभरातील ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध व्हावी हा हेतू आहे. सामूहिक उद्योगासह वैयक्तिक उद्योग, व्यवसायाला बोर्ड व आयोगाकडून दहा लाखांपासून पुढे कर्ज दिले जाते. या सर्वाची संबंधित शासनाच्या विभागाकडे माहिती आहे. ती माहिती घेऊन महिलांनी गावातच राहून उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मिती करून सक्षम व्हावे, असे आवाहन केले.