होमपेज › Konkan › थरारक पाठलाग करत कारसह दारू जप्‍त; दोघांना अटक 

थरारक पाठलाग करत कारसह दारू जप्‍त; दोघांना अटक 

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 10:03PMबांदा : वार्ताहर

मडुरा येथून कुडाळच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची कारमधून बेकायदा वाहतूक करताना बांदा पोलिसांनी थरारक पाठलाग करून कारवाई केली. यात 81 हजार रुपये किमतीच्या दारूसह एकूण 4 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला. ही कारवाई रविवारी सकाळी 8 वा. च्या सुमारास करण्यात आली. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी रूपेश अर्जुन नाईक (रा. न्हावेली-देऊळवाडी) व राजाराम पांडुरंग मांजरेकर (वय 42, रा. झाराप - घाडीवाडी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मडुरा येथून दारू वाहतूक होणार असल्याची माहिती बांदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांना मिळाली होती. त्यानुसार मडुरा येथे कळेकर यांनी आपले सहकारी हवालदार प्रसाद कदम, संजय कदम, महेंद्र बांदेकर यांच्यासह सापळा रचला होता. मडुरा येथून भरधाव वेगात आलेल्या कारला (एमएच04 -डीएन 9637) तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, कारचालकाने तेथून वेगात बांद्याच्या दिशेने पलायन केले. बांदा पोलिस पथकाने थरारक पाठलाग करीत नेमळे येथे कारचालकाला पकडले. कारच्या डिकीत व पाठीमागील सीटवर गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले.