Sun, Aug 18, 2019 20:57होमपेज › Konkan › धरणे, धबधब्यांवरही सुरक्षा महत्त्वाची

धरणे, धबधब्यांवरही सुरक्षा महत्त्वाची

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 8:43PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

पावसाळा सुरु झाल्याने पर्यटकांचा समुद्राकडील ओघ कमी झाला असून धरणे व धबधबे याकडे यांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेतेबरोबर धबधबे आणि धरणे येथील सुरक्षाही महत्त्वाची असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सांगितले.

ते जिल्हाधिकारी दालन येथे आयोजित सागरी सुरक्षा आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक प्रणय अशोक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, भारतीय तटरक्षक दलाचे कमाडंट श्री. पाटील, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री. अहीरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. चव्हाण, नैसर्गिक आपत्ती अधिकारी अजय सूर्यंवशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पावसाळा सुरु  झाल्याने पर्यटकांचा ओघ धरण आणि धबधबे यांच्याकडे वाढला असल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी जिल्ह्यातील प्रत्येक धरण व धबधबे येथे सुरक्षेतेच्या दृष्टीने कोणती व्यवस्था करता येईल, याचा आढावा घेतला. प्रत्येक धबधब्यांबर व धरणांवर तेथील धोक्यांबाबत सूचना देणारे फलक लावण्याच्या सूचना केल्या.  तसेच धरणांवर जीवित हानी होणार नाही, यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत संबधितांशी  चर्चा केली.

तसेच सागरी सुरक्षा अजून मजबूत कशी करता  येईल, याबाबतही त्यांनी यावेळी चर्चा केली. जिल्ह्यातील महत्त्वाच्या समुद्र किनार्‍यावर जीवरक्षक ठेवण्याचेही सूचना त्यांनी या वेळी संबंधितांना दिल्या तसेच सागरी सुरक्षेसाठी खरेदी करण्यात येणारी साधने ही उत्कृष्ट  गुणवत्तेचे  खरेदी  करण्याच्या  सूचनाही  त्यांनी  यावेळी संबंधितांना दिल्या.