Mon, Apr 22, 2019 01:42होमपेज › Konkan › किनार्‍यावर पर्यटकांची हुल्‍लडबाजी रोखा

किनार्‍यावर पर्यटकांची हुल्‍लडबाजी रोखा

Published On: Feb 03 2018 11:24PM | Last Updated: Feb 03 2018 11:01PM रत्नागिरी :  प्रतिनिधी
तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची हुल्‍लडबाजी चालते. वाळूत गाडी नेऊन स्टंट करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे अनेकवेळा वाहने वाळूत रुतण्याचे प्रकार घडले आहेत. यातून त्या पर्यटकांच्या जीवाला धोका उद्भवतो. अशा अतिउत्साही पर्यटकांना गाडी समुद्रकिनार्‍यावर नेण्यास आळा घालण्यासाठी मुख्य रस्त्यापासून किनार्‍यावर जाणार्‍या रस्त्यांवर वाहने प्रवेश करू नयेत, यासाठी हे रस्ते बांध घालून बंद करावेत, अशा सूचना पं. स. सभापती मेघना पाष्टे यांनी दिल्या.

जिल्हा परिषद आवारातील पेजे सभागृहात शनिवारी पंचायत समितीची मासिक सभा सभापती मेघना पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य गजानन पाटील यांनी याप्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधले. काही अतिउत्साही पर्यटक तालुक्यातील भाट्ये, आरे, वारे आणि काजरभाटी समुद्रकिनारी थेट वाळूत आपली वाहने नेतात. याठिकाणी हे पर्यटक शर्यत आणि वेगवेगळे स्टंट याची स्पर्धाच लावतात. वाळूचा अंदाज नसल्याने काहीवेळा ही वाहने वाळूत रुततात. भरतीचे पाणी चढू लागले की रुतलेली वाहने समुद्रात खेचली जातात. यातून प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी पर्यटक आपली गाडी किनार्‍यावर नेणार नाहीत, अशी दक्षता घेणे आवश्यक आहे. मुख्य रस्त्यापासून किनारी भागात जाणारे रस्त्यांवर बांध घालून हे रस्ते वाहनांसाठी बंद करावेत, अशी मागणी केली. यावर सभापतींनी संबधित विभागाला यावर कार्यवाही करण्याची सूचना केली. 

पं. स. कार्यालयाच्या नूतन इमारतीचा आराखडा मंजूर झाला आहे. सातबाराही नावावर झाला असून लवकरच कामाला सुरूवात होईल. सेस निधीच्या अंदाजपत्रकालाही यावेळी मंजुरी देण्यात आली. तालुक्यात 401 वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. गतमहिन्यात घेतलेल्या 208 पाणी नमुन्यांपैकी राई आणि उक्षी येथील दोन पाणी नमुने दूषित आढळले असून या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. 70 टक्के घरपट्टीची तर 66.72 टक्के पाणीपट्टीची वसुली झाली 
आहे. 

स्टेशनरी आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीतून सर्व्हिस सेंटर स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीच्या खात्यावर दरमहा 12 हजार रुपये जमा केले जातात. पण त्या प्रमाणात स्टेशनरी तर उपलब्ध होत नाहीच शिवाय डाटा ऑपरेटरांचाही पगार होत नाही. त्यामुळे कंपनीच्या खात्यावर पैसे जमा न करता याचा अधिकार सरपंचांना द्यावा, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. तसा ठरावही घालण्यात आला.  या बैठकीला उपसभापती सुनील नावले, गटविकास अधिकारी जमदाडे सदस्य शंकर सोनवडकर, उत्तम मोरे, ॠषिकेश भोंगले, दत्तात्रय मयेकर, स्नेहा चव्हाण, जयश्री जोशी आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते.