Thu, Jul 18, 2019 12:19होमपेज › Konkan › पश्‍चिम किनारपट्टीसाठी देवगड बंदर सुरक्षित

पश्‍चिम किनारपट्टीसाठी देवगड बंदर सुरक्षित

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:11PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

दक्षिण भारतात दणका दिल्यानंतर  ओखी चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून सरकत असल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या गुजरातमधीलही नौका आश्रयासाठी जवळच असलेल्या देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे  स्थानिक नौकांबरोबरच तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यातील सुमारे एक हजाराहून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्यामुळे बंदर नौकांनी फुल्ल झाले आहे. दरम्यान केरळ एसपींनी सोमवारी सकाळी देवगड बंदराला भेट देवून केरळ मच्छीमारी नौकांवरील कर्मचार्‍यांशी संवाद साधून विचारपूस केली व समस्या जाणून घेतल्या. तर गेले दोन दिवस ओखी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर देवगड बंदरात दाखल झालेल्या परप्रांतीय नौकांना देवगड पोलिस व महसूल प्रशासनाने चांगले सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे केरळ शासनाने विशेष कौतुक केले आहे. या नौकांना आ नितेश राणे, देवगड नगरपंचायत, राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार घाटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगडमधील स्थानिक मच्छीमार व विविध शासकीय विभागामार्फत सहकार्य करण्यात आले.

परप्रांतीय नौकांना मदतीचा ओघ सुरू असून आ. नितेश राणे यांनी 600 किलो धान्य वाटप केले. देवगड नगरपंचायतीमार्फत व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्यामार्फत पाणी पुरवठा करण्यात येत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नौकांना  गॅस सिलिंडर देण्याची जबाबदारी घेतली आहे.

केरळचे  एसपी डॉ.श्रीनिवास के यांनी सोमवारी सकाळी 10 वा. देवगड बंदराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, पोलिस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण, प्रांताधिकारी सौ.नीता शिंदे, तहसीलदार वनीता पाटील उपस्थित होत्या. 

प्रथम त्यांनी देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झालेल्या केरळ येथील नौकांवर जावून तेथील कर्मचार्‍यांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या.त्यानंतर देवगड बंदर कार्यालय येथेही नौकांवरील कर्मचार्‍यांशी संवाद साधला. त्याबाबत मिळालेली माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकारी व शासनाला दिली.देवगड पोलिस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, सागर पोलिस दलाचे उपनिरीक्षक जितेंद्र साळूंखे उपस्थित होते. 

देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झालेल्या परप्रांतीय नौकांवरील कर्मचार्‍यांनी प्रशासनाकडे गॅस सिलेंडर, पाणी, अन्‍नधान्य, उकडे तांदूळ, डिझेल पेट्रोल इंधन यांची मागणी केली असून त्याप्रमाणे धान्य, पाणीपुरवठा करण्यात आला आहे. नौकांवरील कर्मचार्‍यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली असून 108 रूग्णवाहिका देवगड बंदर कार्यालयासमोर डॉक्टरांसहीत ठेवण्यात आली आहे.या रूग्णसेवेद्वारे आजारी असलेल्या कर्मचार्‍यांवरही उपचार करण्यात आले.

पं.स.मार्फत सहाय्यक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके, देवगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेवक व कर्मचारी ही प्रशासनाची पूर्ण टीम आश्रयासाठी दाखल झालेल्या नौकांना सहकार्य करीत आहेत. सध्या देवगड बंदरात जागा उपलब्ध नसल्यामुळे इतर नौकांना रत्नागिरी बंदराकडे वळविण्यात आले आहे.