होमपेज › Konkan › स्वच्छता अभियानात पोफळी ग्रा.पं. तालुक्यात द्वितीय

स्वच्छता अभियानात पोफळी ग्रा.पं. तालुक्यात द्वितीय

Published On: Aug 17 2018 10:34PM | Last Updated: Aug 17 2018 10:20PMचिपळूण : शहर वार्ताहर

स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविणार्‍या पोफळी ग्रामपंचायतींची दखल घेण्यात आली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात द्वितीय क्रमांक मिळवल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने पोफळी ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.

पोफळी ग्रामपंचायत परिसरात वैयक्तिक तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहण्यासाठी ग्रामपंचायतीने दक्षता घेतली. सार्वजनिक ठिकाणी कचर्‍यांचे  साम्राज्य पसरू नये, यासाठी कचरा कुंडी ठेवण्यात आल्या. 

स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य सदृढ राहावे, यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यामार्फत वैद्यकीय तपासणी करून मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळण्यासाठी जुन्या पाणी योजनांची दुरुस्ती करण्यात आली. आता सर्वांना योग्य दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे.पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय योजनांची ग्रामपंचायतीकडून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. 

या सर्व उपक्रमांची दखल घेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक जाहीर झाला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. पुरस्कार स्वीकारताना पोफळीच्या सरपंच स्नेहा साळवी, उपसरपंच अब्दुल इब्राहीम सय्यद, सदस्य दगडू शिंदे, अर्चना चव्हाण, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते.