Fri, Jan 24, 2020 22:15होमपेज › Konkan › तोंडवळी-वायंगणीत सी-वर्ल्ड

तोंडवळी-वायंगणीत सी-वर्ल्ड

Published On: May 27 2019 11:55PM | Last Updated: May 27 2019 11:55PM
मालवण : मंगेश नलावडे

गेली अनेक वर्षे रखडलेला सी-वर्ल्ड प्रकल्प उभारणीबाबत पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे स्थानिक नेते बाबा मोंडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, 120 एकर जमिनीची संमतिपत्रे संबंधित शेतकर्‍यांनी दिली  असल्याची माहिती मोंडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याची जबाबदारी ज्या पुणे येथील संस्थेकडे देण्यात आली होती, ती संस्था जबाबदारी पार पाडू शकत नसल्यामुळे ती जबाबदारी दुसर्‍या संस्थेकडे देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता सी-वर्ल्ड प्रकल्पाची उभारणी होण्याची आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. 
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला असून त्याला आता 22 वर्षे लोटली आहेत. तरीदेखील पर्यटनासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा अद्याप झालेल्या  नाहीत. त्याशिवाय, पर्यटकांना आकर्षित करणारे मोठे प्रकल्प उभे राहिलेले नाहीत. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी सी-वर्ल्ड प्रकल्प मालवण तालुक्यातील समुद्र किनारी असलेल्या तोंडवळी-वायंगणी या गावांच्या जमिनीमध्ये उभारण्याचे जाहीर केले होते.

भूसंपादनाची प्रक्रिया सुरूही झाली होती. मात्र, या प्रकल्पाला जोरदार विरोध झाला. तब्बल 1300 एकर इतकी जमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार असल्याने हा विरोध तीव्र स्वरूपाचा होता. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तांतर झाल्यानंतर काही महिन्यांतच सिंधुदुर्गात आले होते, तेव्हा त्यांनी सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाच्या मालवणमधील कार्यक्रमात सी-वर्ल्ड प्रकल्पाची जमीन 1300 वरून 350 एकरपर्यंत खाली आणल्याचे जाहीर केले. त्यामुळे काही अंशी विरोध मावळला. तरीदेखील विरोध कायम होता. त्यामुळे गेली चार वर्षे हा प्रकल्प रखडलाच आहे. आता मात्र काही जमीनमालक व शेतकर्‍यांना या प्रकल्पाचे महत्त्व कळू लागले आहे. पर्यावरणदृष्ट्या कोणतेही नुकसान नसणारा हा प्रकल्प पर्यटन विकासाच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरणार आहे, हे आता लोकांना कळू लागले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला असणारा विरोध आता मावळू लागला आहे. बाबा मोंडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी शेतकर्‍यांना या प्रकल्पाचे महत्त्व पटवून सांगितले आहे. 

याबाबत मोंडकर यांनी सांगितले की,  मालवण तोंडवळी-वायंगणी येथील माळरानावर साकारला जाणारा आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून माईल्ड स्टोन ठरणारा सी-वर्ल्ड प्रकल्प होण्यासाठी 350 एकर जमिनीची आवश्यकता आहे. तसा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे. त्यातील 120 एकर जमिनीची संमतिपत्रे शेतकर्‍यांकडून मिळाली आहेत. अशा प्रकारची संमतिपत्रे आणखी साधारणत: 120 एकरपर्यंत मिळू शकते. म्हणजेच, 80 टक्क्यांपर्यंत जमीन उपलब्ध होऊ शकते. समजा जमीन कमी पडली तर जो 350 एकरांमधील आराखडा तयार आहे, त्याच्या बाहेरील, परंतु लागून असलेली जमीनही उपलब्ध होऊ शकते. 

आता  स्थानिक 40 ते 45 टक्के जमीनीच्या मालकांनी आपली संमतीपत्रे मुख्यमंत्री कार्यालय तसेच भापजच्या जिल्हा कार्यालयाकडे सादर केली आहेत. स्थानिकांची घरे, गोठे, शेती, मंदिरे अबाधित ठेवण्याबरोबरच बीच, हिस्ट्री आणि अ‍ॅग्रो टुरिझम यांचा समन्वय साधून हा प्रकल्प साकारण्यासाठी भाजपच्यावतीने प्रयत्न होणार आहेत.

मालवण तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष बबलू राऊत, धोंडी चिंदरकर, प्रमोद करलकर, विनोद भोगावकर आदी उपस्थित होते. तोंडवळी-वायंगणी माळरानावर साकारल्या जाणार्‍या सी-वर्ल्ड या प्रकल्पाबाबत शासन व जनता यांच्यात असलेल्या असमन्वयामुळे गेल्या दहा वषार्ंत हा प्रकल्प मार्गी लागू शकला नाही.  सी-वर्ल्ड प्रकल्पाबरोबरच बीच, हिस्ट्री आणि अ‍ॅग्रो टुरिझम विकसित होईल. या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 350 एकर क्षेत्रात या प्रकल्पाला संमती दिली. या प्रकल्पाची जबाबदारी पुणे येथील पुणे सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेकडे दिली होती. या संस्थेत जे शास्त्रज्ञ, सल्लागार होते त्यांनी राजीनामे दिल्याने या संस्थेकडून या प्रकल्पाचे कामकाज झाले नाही. त्यामुळे या संस्थेकडून जबाबदारी काढून घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

70 ते 80 टक्के जमिनींचे मालक संमतीपत्र देतील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनाच्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे सूतोवाच केले. त्यादृष्टीने जिल्हा भाजपच्यावतीने कार्यवाहीस सुरवात केली आहे. हा प्रकल्प व्हावा अशी स्थानिकांचीही इच्छा आहे. सी-वर्ल्ड प्रकल्प हा विनाशकारी नसून स्थानिक ग्रामस्थांची घरे, शेती, गोठे, मंदिरे ही अबाधितच राखूनच हा प्रकल्प साकारला जाईल. त्यामुळे या प्रकल्पाला ज्यांचा विरोध आहे त्यांच्याकडून गावपातळीवर माहिती घेत त्यांच्यातील गैरसमज दूर केला जाईल. ज्या जमीनमालकांनी संमती दिली त्यांचीही लवकरच बैठक घेतली जाईल असे मोंडकर यांनी स्पष्ट केले. 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर व्हावे

सी-वर्ल्ड प्रकल्पामुळे तोंडवळी-वायंगणी भागात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या दृष्टिकोनातून स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी तोंडवळीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कील डेव्हलपमेंट सेंटर व्हावे अशी मागणी भाजपच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विधानसभेपूर्वी सी-वर्ल्ड प्रकल्पाचे भूमिपूजन व्हावे यासाठी जिल्हा भाजपच्यावतीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.