Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Konkan › #Women’sDayविज्ञानाचा लळा लावणार्‍या मीना कोळपे

#Women’sDayविज्ञानाचा लळा लावणार्‍या मीना कोळपे

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:43PMविज्ञान प्रदर्शन म्हटलं की यश हे ठरलेलंच. स्पर्धेत भाग घ्यायचा आणि यश मिळवायचेच... ही देवरूख-साडवलीच्या मीनाताई ठाकरे विद्यालयाची ओळख. विज्ञान प्रदर्शनातून तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही ठाकरे विद्यालयाने अनेक बक्षिसे पटकावली आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहतात त्या विज्ञान शिक्षिका मीना कोळपे.

विज्ञान प्रदर्शन म्हणजे या हायस्कूलसाठी एक उत्सवच ठरतो. दरवर्षी विज्ञान प्रदर्शन कधी होणार याची उत्सुकता ठाकरे विद्यालयात दरवर्षी असते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून मॉडेल तयार करून घ्यायचे, त्यांच्यासोबत प्रदर्शनासाठी जायचे आणि फक्‍त सहभागी न होता यश मिळवून परतायचेच! हा निर्धार मीना कोळपे यांचा कायम असतो.2015 मध्ये 40 व्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात शाळेने सहभाग घेतला होता.

काजूच्या टरफलापासून तेल काढण्याचे उपकरण प्रदर्शनात मांडण्यात आले होते. कोकणातल्या शेतकर्‍यांसाठी उपयुक्‍त ठरणार्‍या या प्रकल्पाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर या प्रकल्पाने आपले वर्चस्व राखले होते. 2016-17 मध्ये ‘पॅड्स ऑन फायर’ या प्रकल्पाने राज्य  स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. ‘सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट कशी लावावी’ हा विषय प्रकल्पाद्वारे हाताळण्यात आला. राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून याचा गौरव करण्यात आला. दिव्यांग आणि अपघातग्रस्त रुग्णांना उपयुक्‍त ठरणारा मल्टीपल वॉकर विद्यार्थ्यांनी बनवला. त्यालाही यश मिळाले.

दरवर्षी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन होते. त्यात प्रश्‍नमंजूषा, विज्ञान प्रकल्प, शिक्षक प्रकल्प, नाटिका यासाठी झटणार्‍या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशोशिखरापर्यंत पोहोचवणार्‍या मीना कोळपे यांचे कार्य आदर्शवत ठरत आहे. त्या सध्या मीनाताई ठाकरे विद्यालयात विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, मुख्याध्यापक बलवंत नलावडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व सल्लागार समितीची कार्यकारिणी यांची प्रेरणा व सहकार्य मिळत असल्याचे कोळपे मॅडम सांगतात.