Sat, Apr 20, 2019 08:02होमपेज › Konkan › मालोंड नं. 1 शाळा भरली पं. स. मध्ये

मालोंड नं. 1 शाळा भरली पं. स. मध्ये

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 10:21PMमालवण  : वार्ताहर

वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्‍त शिक्षकांची पदे न भरल्याने संतप्त मालोंड ग्रामस्थ व पालकांनी थेट मालवण पं. स. कार्यालयात विद्यार्थ्यांना आणून बसवले. अशाप्रकारे पं. स. कार्यालयातच शाळा भरविल्याने पं. स. मध्ये एकच खळबळ उडाली.गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पालक व गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांची बैठक बोलवत समस्या जाणून घेतल्या. अखेर या शाळेसाठी शिक्षक नेमणूक देण्यात आली. शिक्षकही तातडीने शाळेवर रवाना झाल्याने पालकांनी आंदोलन मागे घेतले.

मालोंड 1 नंबर शाळेत सातवी इयत्तेपर्यंत वर्ग असून, सध्या 25 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निकषाचा विचार करता सहावी ते आठवी या वर्गांसाठी पदवीधर शिक्षक अपेक्षित आहेत. मात्र, तालुक्यात 112 शिक्षक पदे रिक्‍त असल्याने शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत होत आहे. शाळेला पदवीधर शिक्षक द्यावा, यासाठी पालक व ग्रामस्थ सातत्याने मागणीकरत होते. मात्र जि. प. शिक्षण विभाग आपल्या मागणीची दखल घेत नसल्याची तीव्र भावना पालकांच्या मनात निर्माण झाली होती. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालक  व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.  यानुसार मंगळवारी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पालक व ग्रामस्थ मालवण पं. स. मध्ये दाखल झाले व पं. स. कार्यालयातच शाळा भरवली. अखेर विस्तार अधिकारी यांच्या अधिकारात शाळेवर शिक्षक नेमणूक देण्यात आल्याने पालकांनी आंदोलन स्थगित केले. 

सरपंच वैशाली घाडीगांवकर, पोलिसपाटील पांडुरंग तांडेल, सुहास सुर्वे, मकरंद तांडेल, रवींद्र तांडेल, महेश परब, औदुंबर तांडेल, नवनाथ घाडीगांवकर, पूर्वा फणसगावकर, जयवंत पारकर, पद्माकर फणसगावकर, गौरी परब, प्रणाली परब, सुलतान शेख, सुवर्णा मालंडकर आदी व इतर ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते. स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती अशोक बागवे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनीही पालकांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.