Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Konkan › ‘शाळा सिद्धी’ उपक्रमाची ‘विनोद बुद्धी’

‘शाळा सिद्धी’ उपक्रमाची ‘विनोद बुद्धी’

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:43PMदेवरूख : वार्ताहर

दहावीच्या परीक्षांबरोबच स्कॉलरशिपच्या परीक्षादेखील काही दिवसांवर असतानाच प्रशासनाने शाळा सिद्धी मूल्यमापनाचा घाट घातला आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावरच हे मूल्यमापन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर त्याचा परिणाम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी वेठीस धरले जात असल्याने हे मूल्यमापन परीक्षेच्या नंतर घेण्यात यावे, अशी मागणी जिल्हाभरातील शिक्षण संस्थांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एस. एस. सी. परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा असतो. या दहावीच्या यशानंतरच खर्‍या अर्थाने विद्यार्थ्याच्या करिअरला सुरूवात होते. म्हणूनच एस. एस. सी. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी धडपडत असतात. परंतु, या परीक्षेच्या तोंडावर आता शाळासिद्धी उपक्रम राबवण्यात येणार आहे.  शाळा सिद्धी मूल्यमापन 2016-17 या शैक्षणिक वर्षांसाठी होत आहे. मागील शेैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन ऐन परीक्षेच्या तोंडावरच होत आहे. या शाळा सिद्धीच्या मूल्यमापनासाठी 5 व 8 फेब्रुवारी रोजी शिक्षकांचे प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षण वर्गामुळे आणि शाळा सिद्धीच्या मूल्यमापनाला सामोरे जाण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. फाईल्स अपडेट करणे तसेच 
मागील उपक्रमांचा अहवाल तयार करणे अशा सार्‍या बाबींमध्ये शिक्षकांचा वेळ जात आहे. यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे एकप्रकारे तारेवरची कसरत बनली आहे.

माध्यमिक शाळांच्या एस.एस.सी. परीक्षांचे मूल्यमापन काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे वर्षभराचे प्रकल्प विविध विषयांच्या वह्या यांचे मूल्यमापन करून त्या वह्या जमा करून देण्याचे काम सध्या सुरू आहे. यानंतर लगेचच विद्यार्थ्यांची कलचाचणी, विज्ञान प्रात्यक्षिक, आयसीटी प्रात्यक्षिक सर्व विषयांच्या तोंडी परीक्षा सुरू होणार आहेत. या सर्वांचे मूल्यमापन करून त्यांचे गुणदान करण्याचे महत्त्वाचे काम शिक्षकांवर आहे. विद्यार्थ्यांचा सराव व त्यांना मार्गदर्शन करावे लागते म्हणजेच या अखेरच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांची अधिक गरज असते. शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी ज्यादा वेळ द्यावयाचा असतो. परंतु, याच महत्त्वाच्या व अखेरच्या दिवसांमध्ये प्रशासनाने शैक्षणिक वर्ष 2016- 17 चा शाळा सिद्धी मूल्यमापनाचा प्रपंच केला असल्यामुळे शिक्षक वर्ग व्यस्त झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. 

त्यातच शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेबु्रवारीला होत आहे. त्यांचे प्रत्येक शाळांमधून विशेष मार्गदर्शन व सराव चालू आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडेही आता लक्ष देण्यासाठी शिक्षकांना वेळ नाही.

मूल्यमापनाला कोणत्याही  शाळांचा विरोध नाही. मात्र, या सार्‍या महत्त्वाच्या परीक्षांचा विचार करता मूल्यमापन करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे बोल जिल्हाभरातून उमटत आहेत. शाळा सिद्धी होईल पण विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. याबाबत प्रशासनाने योग्य विचार करावा. 

शाळेत शिक्षकांची संख्या कमी असतानाही अतिरिक्‍त भार  सांभाळत शिक्षक शिक्षणाचा गाडा पुढे ओढताना दिसत आहेत. त्यामुळे शाळा सिद्धी मूल्यांकन हे परीक्षांनंतरच घेतले जावे, अशी मागणी जिल्ह्यातील संस्थाचालक, पालक व शिक्षक वर्गातून होत आहे.