Mon, Jan 27, 2020 12:45होमपेज › Konkan › वैद्यकीय महाविद्यालयासाठी सावंतवाडी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांना 10 हजार पत्रे 

वैद्यकीय महाविद्यालयासाठी सावंतवाडी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांना 10 हजार पत्रे 

Published On: Jul 02 2019 2:05AM | Last Updated: Jul 02 2019 1:35AM
सावंतवाडी : प्रतिनिधी 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खिळखिळी झालेली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला व कुडाळ या चार तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीची तब्बल दहा  हजार पत्रे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती सिंधुदुर्ग यांच्याकडून  सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आली.

 नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्‍नपूर्णा कोरगावकर, अ‍ॅड. शामराव सावंत, सीए लक्ष्मण नाईक, नगरसेवक अ‍ॅड. परिमल नाईक, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर, सांगेली सरपंच मनस्वी राऊळ, अभय किनळोस्कर, हेलन निब्रे, पत्रकार दीपक गावकर, अनंत मेस्त्री, भगवान रेडकर, अ‍ॅन्ड्रू फर्नांडिस आदी पदाधिकारी उपस्थित होते. ही पत्रे जिल्ह्यावासीयांनी लिहिली असून यात बहुसंख्य महिलांचा समावेश आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा प्रश्‍न गंभीर आहे. येथील जनतेला आरोग्य सुविधा मिळत नसल्याने नजीकच्या गोवा राज्यावर नेहमीच अवलंबून राहावे लागत आहे.सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सुधारावी, रुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात याकरिता येथील राजकीय पुढारी, सामाजिक संस्थांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी केली होती. मात्र यात किंचितही सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. नजीकच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्गातील रुग्णांना सुरू असलेल्या मोफत सुविधा बंद करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतल्याने येथील आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याबाबत सर्व स्तरातून शासनावर चौफेर टीका झाली होती. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मोफत सुविधा कायम राहावी यासाठी अनेकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला. मात्र आजही तेथील सुविधेबाबत अनिश्‍चितता आहे. हे प्रश्‍न सुटण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा उपाय आहे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच सावंतवाडी, दोडामार्ग वेंगुर्ले, कुडाळ याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीसाठी कृती समिती स्थापन झाली. त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षात जनजागृती मोहीम हाती घेतली. याचाच एक भाग म्हणून दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याची मोहीम हाती घेतली होती. तालुक्यात ही मोहीम राबवताना कृती समितीने दहा हजारपेक्षा जास्त पत्रे आज मुख्यमंत्री फडणवीस यांना पोस्टद्वारे पाठवली. ही पत्रे पोस्ट मास्तर सावंतवाडी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

वेंगुर्लेतून दहा हजार पत्रे पाठवणार
जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्य यंत्रणेवर केलेले काम लक्षात घेता आमच्या मागणीचा ते नक्‍कीच विचार करतील. जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्‍न हा दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वेंगुर्लेतूनही दहा हजार पत्रे लवकरच मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याचे सांगेली सरपंच मनस्वी राऊळ यांनी यावेळी बोलताना सांगितले. दोडामार्गमधून या आधीच पत्रे पाठविण्यात आली आहेत.