Sun, Apr 21, 2019 02:23होमपेज › Konkan › प्रियकराच्या मदतीने शिक्षक पतीचा घात

प्रियकराच्या मदतीने शिक्षक पतीचा घात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी 

गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खुनाचा पर्दाफाश करण्यास सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. विजयकुमार अप्पैया गुरव (47) यांचा खून त्यांच्या पत्नीनेच  प्रियकराच्या मदतीने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी संशयित सुरेश आप्पासो चोथे (32) व गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव (30) या दोघांना रविवारी रात्री मुंबई-लोअर परेल येथून ताब्यात घेतले. हा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

गुरव यांचा मृतदेह आंबोली-कावळेसादच्या दरीत 12 नोव्हेंबर 2017 रोजी सापडला होता. त्यांचे डोके दगडाने ठेचल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती, मात्र दुसर्‍या दिवशी त्यांच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवली होती. खुनाच्या प्रकारानंतर संशयित सुरेश आप्पासो चोथे हा चौथ्या दिवशी फरार झाला होता. तर त्यानंतर काही दिवसांनी गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी हीसुद्धा रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने या प्रकाराचे गूढ वाढले होते. पोलिसांनी दोघांचा मागोवा घेत रविवारी रात्री त्यांना मुंबई-लोअर परेल येथे जेरबंद केले.   मात्र, त्यांचा खून घरी करण्यात आला की अन्य कोठे, याचा शोध घेण्यासाठी मयताच्या भडगाव (गडहिंग्लज) येथील घरी फॉरेन्सिक टीम तपास करणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी सांगितले. 

 मोबाईल लोकेशनमुळे संशयित जाळ्यात

 दोन दिवसांपूर्वी विजयकुमार गुरवच्या तिन्ही मुलांनी व नातेवाईकांनी बेपत्ता झालेली पत्नी जयलक्ष्मी व संशयित सुरेश चोथे यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती. पत्नी जयलक्ष्मी हिने घरातून पळून जाण्याआधी सुमारे 50 तोळे सोने व इतर साहित्य आपल्या सोबत नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांना सुरेश चोथे याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले असता,  ते मुंबई,  दिल्ली, गुजरात आणि कोल्हापूर असे मिळू लागले. यावरुन तो एकाच ठिकाणी कोठे थांबत नव्हता. दरम्यान शनिवारी रात्री त्याचे लोकेशन मुंबई-घाटकोपर परिसरात आढळले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांना अटक केली, अशी माहिती सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक तथा तपासिक अंमलदार सुनील धनावडे यांनी दिली.  

चौकशीनंतर मयताची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश बुधवंत यांनी तुमचा बचाव मांडण्यासाठी वकील आहे का? असा प्रश्‍न दोघांना विचारला. यावेळी दोघांनी नाही असे म्हटले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या अ‍ॅड. परशुराम चव्हाण यांना वकीलपत्र घेण्याची सूचना न्यायाधीश बुधवंत यांनी केली.