होमपेज › Konkan › सावंतवाडी रुग्णालयाला औषध खरेदीसाठी निधी

सावंतवाडी रुग्णालयाला औषध खरेदीसाठी निधी

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 10:09PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील संपलेला औषधसाठी तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या निधीतून 50 हजार रुपयांची रक्‍कम उपलब्ध करुन दिली व तत्काळ औषध खरेदी करण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्‍तम पाटील यांना दिले. 

गेल्या महिनाभरात या रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरुन स्वखर्चाने औषध खरेदी करावी लागत होती. याकडे  जि. प. आरोग्य व शिक्षण माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी लक्ष वेधले होते. तसेच जनआक्रोश  आंदोलनात सहभागी झालेले सुरेश  सावंत यांनी स्वखर्चातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अत्यावश्यक सलाईनच्या बाटल्यांसह औषध साठा  वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्‍तम पाटील यांच्याकडे सुपूर्द केली होती. 

  संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी काळजी न घेतल्याने मार्च अखेरीस औषध साठ्याचा तुटवडा निर्माण झाला होता. सावंतवाडी येथील अधिकर्‍यांच्या बैठकीत ही बाब निदर्शनास येताच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या निधीतून 50 हजार रुपयांची तातडीचा निधी औषध साठ्यासाठी उपलब्ध करुन दिला. तसेच कोणत्याही उपजिल्हा रुग्णालयात आणि आरोग्य केंद्रात औषध तुटवडा होऊ नये यासाठी आरोग्य विभागाला निर्देश दिले. 

डॉ. उत्तम पाटील, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे, तहसीलदार सतीश कदम, सा.बां. विभागाचे उपअभियंता अनिल आवटी आदी उपस्थित होते.