Sat, Apr 20, 2019 08:43होमपेज › Konkan › सावंतवाडी शासकीय विश्रामगृहाला ठोकले कायमचे टाळे!

सावंतवाडी शासकीय विश्रामगृहाला ठोकले कायमचे टाळे!

Published On: Nov 30 2017 11:32PM | Last Updated: Nov 30 2017 9:00PM

बुकमार्क करा

सावंतवाडी :प्रतिनिधी 

शासकीय अधिकारी वगळता सर्वसामान्य लोकांसाठी सावंतवाडी पर्णकुटी शासकीय विश्रामगृह कायमचे बंद करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार  हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सा.बां.चेे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी  सांगितले.या निर्णयामुळे पत्रकार परिषदा तसेच बैठकांसाठी येणार्‍या अनेक राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे.

सीसीटीव्हीचा बाऊ करून या शासकीय विश्रामगृहाला  टाळे ठोकण्यात आले आहे.या विश्रामगृहात विविध राजकीय पदाधिकार्‍यांच्या बैठका,पत्रकार परिषदा होत होत्या.मात्र गेल्या कांही दिवसात विश्रामगृहावर काही संघटनेचे पदाधिकारी तसेच अन्य अपरिचित व्यक्ती येऊन बसत असल्यानेे टीका झाली होती.या प्रकाराच्या चौकशीची मागणीही झाली होती. त्यानंतर ग्रा.पं.निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विश्रामगृहाच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणील अनुचित प्रकार कमी झाले.मात्र, या सीसीटीव्हीचा बाऊ करून  विश्रामगृहाच्या सभागृहालाच टाळे ठोकण्यात आले आहे.

यासंदर्भात विश्रामगृहात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता कार्यालयीन आदेश येत नाहीत,तोपर्यंत आम्ही सभागृह उघडणार नाही,असे त्यांनी सांगितले. यावर सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,विश्रामगृह बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यात आमचा कोणताही दोष नाही, मात्र, सभागृह उघडे ठेवणे गरजेचे असून तशा  सूचना आपण कर्मचार्‍यांना करू, असे स्पष्ट केले.