होमपेज › Konkan › ...तर आझाद मैदानात उपोषण!

...तर आझाद मैदानात उपोषण!

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:02PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : शहर वार्ताहर

पोषण आहार बाबत प्रशासनाचा घोळ चालू असून जिल्ह्यातील शाळांचा पोषण आहार बंद असल्याचा आरोप माजी जि.प.सभापती मंगेश तळवणेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. सिंधुदुर्गातील कमी पटसंख्येच्या 153 शाळा चुकीच्या पद्धतीने बंद करण्याचा घाट शासनाने घातला असून त्यामुळे दुर्गम भागातील गरीब मुलांचे नुकसान होणार आहे. शिक्षणाबाबत सिंधुदुर्गातील डोंगरी भागासाठी शासनाने वेगळे निकष तयार करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे केली जाणार असून, न्याय न मिळाल्यास आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशाराही  दिला.

पर्णकुटी विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तळवणेकर म्हणाले, ऑनलाईन पध्दतीने शालेय कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून कॅफेमध्ये धाव घ्यावी लागत आहे. शासनाने शाळा डिजिटल केल्या, मात्र अनेक शाळा इंटरनेटने न जोडल्याने ही कामे कॅफेमध्ये जाऊन करण्याशिवाय शिक्षकांकडे पर्याय नाही. जोपर्यत ग्रामीण भागात इंटरनेट उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शिक्षकांना सदरची कामे पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने करण्याची परवानगी द्यावी.

जिल्ह्यातील 1ली ते 7 वी पर्यंतच्या कमी पटसंख्येच्या 153  शाळा बंद होणार आहेत. या निर्णयाने इंग्रजी माध्यम शाळांचा फायदा होऊन, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांचे यामुळे नुकसान होणार आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्यास ग्रामीण भागातील गरीब मुलांनी कुठे जायचे, असा सवाल करत या शाळा बंद होऊ नये, यासाठी आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा तळवणेकर यांनी दिला.  15 डिसेंबरला ओरोस रवळनाथ मंदिर येथे बैठक होणार आहे. यावेळी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे 26 डिसेंबर रोजी शिक्षक मेळाव्यासाठी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. यावेळी हे सर्व मुद्दे उपस्थित करून न्याय मागितला जाणार आहे .मात्र शासनाने न्याय न दिल्यास थेट आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.