Fri, Apr 26, 2019 09:56होमपेज › Konkan › सत्तेचा दुरुपयोग करणार्‍यांना जशास तसे उत्तर

सत्तेचा दुरुपयोग करणार्‍यांना जशास तसे उत्तर

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 10:58PMसावंतवाडी : प्रतिनिधी

राणे कुटुंबीय व्यावसायिक आहेत. राजकारण हा आमचा व्यवसाय नाही. आज माझी दोन्ही मुले स्वतःचा व्यवसाय संभाळून जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राजकारणात झटत आहेत. मात्र, आमच्यावर नाहक टीका करणारे पालकमंत्री व सत्ताधारी  आमदार, खासदारांनी विकासाचं एक तरी काम केलं तर सांगावे, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विरोधकांना दिले. सत्तेचा दुरुपयोग करणार्‍या या नेत्यांना अपाण जशास तसे उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सुंदरवाडी महोत्सव’ समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

सौ.नीलम राणे, सुंदरवाडी महोत्सवाचे अध्यक्ष  माजी खा. नीलेश राणे, जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, स्वाभिमानचे  उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष  संजू परब, शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सभापती रवींद्र मडगांवकर, महिला तालुकाध्यक्षा गीता परब, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर, विशाल परब, आनंद शिरवलकर आदींसह अन्य कार्यकर्ते, पक्षाचे जि. प. व पं. स. सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. नारायण राणेंनी थेट पालकमंत्र्यावर शरसंधान साधले.  पालकमंत्र्यांनी जिल्हयाची शान घालविली आहे.

पालकमंत्री सभागृहात उभा  राहिला की त्याची चेष्टा होते. त्याला धड उभंही राहता येत नाही. उत्तर देणं सोडाच, त्यामुळेच आमचे प्रश्‍न आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडतो. खासदाराला तर हिंदी, इंग्रजीही धड बोलता येत नाही, अशी टीका करत पालकमंत्री, खासदार व आमदार हे तिघेही अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, जनतेने याची काळजी करू नये, जिल्हयाच्या विकासासाठी मी नेहमीच तत्पर  असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सिंधुदुर्गच्या विकासाची  जबाबदारी आमची 

सिंधुदुर्गवासीयांनी राणे परीवाराला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. त्यांच्यामुळेच मी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता  आणि पुन्हा मंत्री अशी सर्व पदे भूषविली. त्यामुळे या जनतेला आनंद दयावा, त्यांचा विकास करावा, ही माझी जबाबदारी आहे. राणे सत्तेत असो वा नसो त्याच दिमाख कायम राहणार आहे. आम्ही कार्यक्रम करून नव्हे तरे काम व विकास करूनच मते मागतो. सिंधुदुर्ग हा बुद्धीमान लोकांचा जिल्हा आहे. हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर सिंधु महोत्सवासारखे दिखामदार सोहळे घेऊन आम्ही जनतेचे मनोरंजन केले, मात्र, या मनोरंजनाच्या कार्यक्रमातून जनतेने विकासात्मक बोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सुंदरवाडी महोत्सवाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, नेटके नियोजन पाहून नारायण राणेंनी समाधान व्यक्‍त करत निलेश राणे व संजू परब यांचे कौतुक केले.   लोकांना जे हवं आहे ते देत राहा, विकास द्या, आनंद द्या, मी तुमच्या पाठिशी सदैव राहीन, असा विश्‍वास त्यांनी  व्यक्त केला. जर प्रगती साधायची असेल तर लोकप्रतिनिधीही त्याच दर्जाचे हवेत. तुम्ही ज्यांना निवडून दिलेत त्यांनी या जिल्हयाचा विकास ठप्प केला आहे. मी या जिल्हयाच्या विकासासाठी सुरू केलेले सर्व प्रकल्प आज थांबले आहेत. सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ, दोडामार्ग एमआयडीसी, आयटी पार्क यासारखे प्रकल्प बंद पडले आहेत.

हायवेचे काम आम्हीच मंजूर करून घेतले. मात्र,  2014 साली चिपी  विमानतळ बांधून तयार होऊनही त्यावर विमान उड्डाण करण्याची क्षमता आजच्या लोकप्रतिनिधींमध्ये नाही. अशी टीका त्यांनी केली. 

वाकड्या नजरेने पहाल तर  सोडणार नाही : नीलेश राणे  

राणे साहेबांचा सैनिक या नात्याने या जिल्हयात सर्वात मोठी दहीहंडी मी सुरु केली. लालबागच्या राजासारखीच प्रतिमा असलेला सिंधुदुर्गचा राजा गणेशोत्सव,भव्य क्रिकेट स्पर्धा आम्ही सुरू केल्या. सुंदरवाडी महोत्सवासारखे दिमाखदार सोहळे आयोजित करून सावंतवाडीकरांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही मंडळी यात व्यत्यय आणू पाहत आहेत. या महोत्सवासाठी उपस्थित राहिलेल्या कलाकारांना मध्यरात्री त्रास देण्याचे काम होत आहे. ते राहत असलेल्या हॉटेलवर रेड टाकत त्यांचा अपमान केला गेला आहे. या महोत्सवातून आम्हांला राजकारण साधायचे नाही. मात्र, आम्हीही राणे साहेबांचे सैनिक आहोत. आमच्याकडे वाकडया नजरेने पाहाल तर सोडणार नाही, असा इशारा नीलेश राणेंनी दिला. 

आजही प्रचंड गर्दीत समारोपाचा कार्यक्रम होत आहे. तुमचे हे प्रेम असंच राहू द्या. तुम्हांला आनंद देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 
आमच्या कार्यक्रमाबाबत पालकमंत्र्यांच्या पोटात का दुखते ते कळलं नाही. दरवर्षी या कार्यक्रमाला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न ते करतात, असा आरोप नीलेश राणेंनी केला.