Mon, May 20, 2019 22:14होमपेज › Konkan › महिला कलाकारांची झडती; पोलिस अधिकार्‍याच्या निलंबनाची मागणी

महिला कलाकारांची झडती; पोलिस अधिकार्‍याच्या निलंबनाची मागणी

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 11:06PMसावंतवाडी :  प्रतिनिधी 

सुंदरवाडी महोत्सवासाठी  आलेल्या व हॉटेलवर थांबलेल्या  महिला कलाकारांची तपासणी महिला पोलीस न घेता करणारे  सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांचे आठ दिवसांत निलंबन न केल्यास  तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायती समोर साखळी उपोषण आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिला.  एपीआय अरुण जाधव यांनी महिला कॉन्स्टेबल न घेता शनिवारी मध्यरात्री 2.30 वा. ख्यातनाम गायक आदर्श शिंदे यांच्यासह ‘रंग मराठी मनांचा’ कलाकार ज्या हॉटलमध्ये होत, त्या हॉटेलमध्ये जात या कलाकरांची झडती घेतली. यात महिला कलाकार होत्या.

अरुण जाधव यांनी ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरुन केली. त्यांचा कर्ता करविता कोण?  गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्र्याचा हे कटकारस्थान असल्याचा आरोप संजू परब यांनी केला. या कलाकार महिलांना उठवुन तपासण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले, असे जाधव सांगत होते. जाधव यांच्यावर तत्काळ जिल्हा पोलीस प्रमुखांनी कारवाई न केल्यास दर दिवशी साखळी उपोषण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संजू परब यांनी  दिला. 

 दरम्यान, याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे जिल्हा पोलिस प्रमुख  व या पोलीस अधिकार्‍यांची तक्रार माजी खासदार  नीलेश राणे यांनी केली आहे.तसेच भविष्यात विनयभंगाचा  गुन्हाही दाखल करणार असल्याचे संजू परब यांनी सांगितले.  सुंदरवाडी महोत्सवात विघ्न आणण्यासाठीच!  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सावंतवाडीत आयोजित केलेल्या सुंदरवाडी महोत्सवात विघ्न आणण्यासाठीच ही मोहीम राबविण्यात आली होती. महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांनाही पोलिसांकडून त्रास देण्यात आला. राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या इशार्‍यानेचही ही कारवाई करण्यात आली. असा आरोप स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केला.