Thu, Jan 17, 2019 22:49होमपेज › Konkan › महाड : सावित्री नदीने ओलांडली धोक्‍याची पातळी (video)

सावित्री नदीने ओलांडली धोक्‍याची पातळी (video)

Published On: Jul 07 2018 3:27PM | Last Updated: Jul 07 2018 3:29PMमहाड : प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाड शहर आणि परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी शाळेत गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.  

महाडमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सावित्री नदीला पूर आला आहे. समुद्राला ओहोटी लागल्यावर पुराचे पाणी ओसरेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला देखील बसला आहे. महाड-रायगड मार्गावरील महाड जवळच्या पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे. 

बिरवाडीतील एका पुलावर पाणी आल्यानं अंतर्गत वाहतूक थांबली असल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी दिली आहे.  सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. याशिवाय महाड बाजारपेठ,  भाजी मंडई,  दस्तुरी  भागात  पाणी  भरण्याची  शक्यता  आहे.  सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.