Wed, Apr 24, 2019 15:29होमपेज › Konkan › ‘नाणार’मध्ये सौदीची भागीदारी

‘नाणार’मध्ये सौदीची भागीदारी

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 9:36PMदिल्‍ली/रत्नागिरी : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील नाणार येथील नियोजित रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये जगातील सर्वात मोठी सौदी अरेबियातील ‘अरामको’  या तेल उत्पादक कंपनीची 50 टक्के भागीदारी राहणार आहे. यासंदर्भात नवी दिल्‍ली येथे बुधवारी सामंजस्य करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्‍या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. याबाबत सविस्तर बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन भारतीय तेल कंपन्यांच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील नाणार येथे संयुक्‍त तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठी तेल पुरवठादार असणार्‍या सौदी अरेबियातील ‘अरामको’ ही जगातील सर्वाधिक तेल उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी महाराष्ट्रातील 44 अब्ज डॉलर्सच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पातील 50 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. सौदी अरेबिया या प्रकल्पाच्या 60 दशलक्ष टन क्षमतेपैकी अर्धा पुरवठा करेल. उर्वरित भाग भांडवल इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांची असेल. नाणार येथे उभारण्यात येणार्‍या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 12 लाख पिंप इतकी राहणार आहे. 

भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावर वसलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रकल्पामुळे सौदी अरेबियातून कमी खर्चात भारताला इंधन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणीही कायम राहील, असे प्रधान म्हणाले. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रतिपिंप असल्यास ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अधिक आश्‍वासक राहील, असे मत पेट्रोलियम मंत्र्यांनी व्यक्‍त केले आहे.सौदी अरेबियाचे तेलमंत्री खालिद ए. अल-फलिह म्हणाले की, सौदी अरेबियाचे गुंतवणुकीसाठी भारताला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. ‘अरामको’ पश्‍चिम किनार्‍यावर तेलशुद्धीकरण प्रकल्पासोबतच अन्य संधीही शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.

Tags :  Konkan, Saudi, involvement,  Nanar