Tue, Mar 19, 2019 12:22होमपेज › Konkan › राज्यातील ४२ हजार शिक्षकांना घरबसल्या प्रशिक्षण

राज्यातील ४२ हजार शिक्षकांना घरबसल्या प्रशिक्षण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सैतवडे : वार्ताहर

महाराष्ट्र शासन, विद्या  प्राधिकरण पुणे, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व शिक्षण विभाग यांच्या वतीने एकाच वेळी संपूर्ण राज्यभरातील 42 हजार 114 शिक्षकांना हे आगळे-वेगळे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पुणे, मुंबई किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी न जाता मोबाईल अ‍ॅप आणि पोर्टलवरच शिक्षकांना घेता येणार आहे. अत्यंत अभिनव व पारंपरिक खडू-फळा विरहीत व घरबसल्या या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

विद्या प्राधिकरणाने दि. 22 नोव्हेंबरपासून एकाचवेळी हे प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातंर्गत अविरत प्रशिक्षणासाठी प्राधिकरणाने शिक्षकांना आदेश देण्याऐवजी आवाहन केले होते.त्यानुसार प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक असे गृहीत धरून पहिल्या टप्प्यात 40 हजार शिक्षक सहभागी होतील, असा अंदाज असताना प्रत्यक्षात मात्र 42 हजाराहूनही अधिक शिक्षकांनी या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. 

या शिक्षकांना अविरत पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे पुढील दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या दहा दिवसांतील सुरवातीचे केवळ दोन दिवस मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून तालुकास्तरावर प्रत्यक्ष या प्रशिक्षणाची माहिती दिली गेली आहे. या पुढील आठ दिवसांचे प्रशिक्षण शिक्षकांना स्वतः ऑनलाईनद्वारे पूर्ण करावे लागेल. एकूण हे दहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांचे ऑनलाईन मूल्यांकन करण्यात येणार आहे. लगेच प्रमाणपत्रही ऑनलाईन मिळणार आहे.

 प्रत्येक तालुक्यात एक मुख्याध्यापक व एक शिक्षक असे दोन मास्टर ट्रेनर यांनी हे प्रशिक्षण दिले. 36 जिल्ह्यांतील, 408 तालुक्यांसाठी 830 मास्टर ट्रेनर निवडून त्यांना पुण्यामध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण निवडश्रेणी, वेतनश्रेणीकरताही उपयोगी पडेल. अविरत प्रशिक्षण घेणार्‍या  शिक्षकांना मोबाईल अ‍ॅप व अविरत पोर्टल पूर्ण करण्यासाठी विद्या प्राधिकरणाकडून प्रशिक्षणार्थी   शिक्षकांना नेटपॅकसाठी प्रत्येकी दीडशे रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय या 42 हजार शिक्षकांना  अविरत पोर्टलचे वर्षभरासाठी मोफत सभासदत्व दिले जाणार आहे.किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय अविरत प्रशिक्षण फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथे  झाले. तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. किशोरवयीन विद्यार्थी व त्यांच्या मेंदूविषयक जागतिक संशोधनावर आधारित प्रशिक्षण पार पडले. तसेच 21 व्या शतकातील  करियरच्या संधी व विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या निर्णयक्षमता विकसित करणे,  हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या प्रशिक्षणापेक्षा अत्यंत वेगळ्या व कागदपत्र तसेच खडू फळ्याला फाटा देऊन सर्व शिक्षकांना आपल्या फावल्या वेळेत हे प्रशिक्षण घेता येत असल्याने पहिल्या टप्प्यात शिक्षकांनीही आनंदाने हे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणासाठी नाणीजचे मुख्याध्यापक शिवाजी तोंदले व प्रभाकर धोत्रे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. या प्रशिक्षकांना ‘डाएट’चे प्राचार्य शेख, इम्तियाज शेख  यांनी मार्गदर्शन केले.